पाळधीत बसच्या चाकाखाली येऊन १६ वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
शाळा सुटल्यानंतर बस पकडताना गर्दीत तोल गेला; राजनंदिनी शिंदेच्या मृत्यूने परिसरात हळहळ
पाळधी | प्रतिनिधी :
शाळा सुटल्यानंतर बस पकडण्यासाठी झालेल्या गर्दीत तोल जाऊन बसच्या मागील चाकाखाली आल्याने १६ वर्षीय विद्यार्थिनी राजनंदिनी श्रीराम शिंदे हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पाळधी येथे घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी विद्यार्थी बसस्थानक परिसरात मोठ्या संख्येने गर्दी करतात. याच वेळी बस पकडण्याच्या प्रयत्नात राजनंदिनी हिचा गर्दीत तोल गेला आणि ती बसच्या मागील चाकाखाली आली. या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला.
राजनंदिनीच्या अकाली निधनामुळे तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, तिच्या मृत्यूने परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्येही शोककळा पसरली आहे.
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळा सुटण्याच्या वेळेत विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालक आणि नागरिकांकडून होत आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि बस पकडण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता शाळा सुटण्याच्या वेळेचे नियोजन, अतिरिक्त बसफेऱ्या तसेच बसथांब्यावर सुरक्षित वाहतूक व्यवस्थेची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संबंधित प्रशासन आणि परिवहन यंत्रणेने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
