‘सुंदर माझी शाळा’ उपक्रमात सत्रासेन आश्रमशाळा जिल्ह्यात प्रथम
सन्मानचिन्हासह एक लाखांचे पारितोषिक; शिक्षणमहर्षी संस्थापक अध्यक्षांचे शैक्षणिक स्वप्न साकार
चोपडा | प्रतिनिधी – राहुल पाटील : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग, नाशिक अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या वतीने सन २०२५-२६ मध्ये राबविण्यात आलेल्या ‘सुंदर माझी शाळा व वसतिगृह’ उपक्रमात धनाजी नाना चौधरी आदिवासी सेवा मंडळ, सत्रासेन संचलित धनाजी नाना प्राथमिक व डी.आर.बी. माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, सत्रासेनने अनुदानित आश्रमशाळा गटातून जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.

या दैदिप्यमान कामगिरीबद्दल शाळेला सन्मानचिन्ह आणि रोख एक लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. बक्षीस वितरण सोहळ्यात उपआयुक्त श्री. हिवाळे, प्रकल्प अधिकारी श्री. अरुण पवार, उपजिल्हाधिकारी श्री. श्रीमंत हरकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. प्रशांत माहुरे, श्री. संदीप पाटील, श्री. प्रदीप दाभाडे, श्री. पवन पाटील तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्रीमती मिनाक्षी सुलताने आदींच्या उपस्थितीत शाळेचा गौरव करण्यात आला.
स्वच्छता, पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य
शाळेची स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व आनंददायी शैक्षणिक वातावरण, शिस्तबद्ध नियोजन तसेच विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे शाळेने जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळविला.
या यशामुळे शिक्षणमहर्षी संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आप्पासाहेब रायसिंग फुगा भादले यांनी पाहिलेले शैक्षणिक विकासाचे स्वप्न साकार होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. त्यांच्या शैक्षणिक विचारांना आणि दूरदृष्टीला ही यशस्वी वाटचाल खरी आदरांजली ठरली आहे.
सामूहिक प्रयत्नांना यशाची पावती
शाळेच्या या यशात प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. एकजूट, सातत्यपूर्ण मेहनत, नियोजन आणि समर्पित कार्याच्या जोरावर शाळेने हा बहुमान मिळविल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष रविंद्र रायसिंग भादले, उपाध्यक्ष धनंजय रायसिंग भादले, सचिव ज्ञानेश्वर रायसिंग भादले, संचालक जितेंद्र रायसिंग भादले, नरेंद्र रायसिंग भादले, परमवीर रायसिंग भादले व चैतन्य भादले तसेच सत्रासेन गावाच्या लोकनियुक्त सरपंच वंदना ज्ञानेश्वर भादले यांनी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यातील अनुदानित आश्रमशाळा गटातून प्रथम क्रमांक मिळवत सत्रासेन आश्रमशाळेने आपल्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मानाचा टप्पा गाठला असून, या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
