जामखेडमध्ये महामार्गावरील अतिक्रमणांवर नगरपरिषदेचा धडक हातोडा!
गटारापासून १० फुटांपर्यंतची अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची आशा, नागरिकांमध्ये समाधान
अहिल्यानगर प्रतिनिधी : बापुसाहेब घोडेस्वार
जामखेड : शहरातील जामखेड-सौताडा महामार्गालगत गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमणाच्या गंभीर प्रश्नावर अखेर नगरपरिषदेने धडक कारवाई सुरू केली आहे. जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेतली असून, या कारवाईमुळे बेकायदेशीर अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत. कारवाईला सुरुवात होताच नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
महामार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या गटारापासून तब्बल १० फुटांपर्यंतच्या जागेवरील अतिक्रमणे हटविण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. या अतिक्रमणांमुळे महामार्गाची उपलब्ध रुंदी कमी होऊन शहरात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत होती. वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या या मार्गावर वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत होता.
जामखेडकरांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
अतिक्रमणामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीविरोधात जामखेडकरांनी सातत्याने आवाज उठविला होता. निवेदने, बैठका, प्रशासनाकडे पाठपुरावा तसेच आंदोलनांच्या माध्यमातून नागरिकांनी हा प्रश्न लावून धरला होता. अखेर प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केल्याने नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीला यश आले आहे.
या कारवाईचे सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी स्वागत केले आहे. हा केवळ अतिक्रमण हटविण्याचा निर्णय नसून, जामखेडकरांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कारवाईत दुजाभाव नको; निष्पक्ष मोहिमेची अपेक्षा
दरम्यान, प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम काही ठराविक ठिकाणांपुरती मर्यादित न ठेवता नियमाप्रमाणे, पारदर्शक आणि कोणताही दुजाभाव न करता राबवावी, अशी अपेक्षा नागरिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. महामार्गालगतच्या सर्व अतिक्रमणांवर समान निकषाने कारवाई करण्याची मागणीही पुढे आली आहे.
वाहतूक कोंडीपासून मिळणार दिलासा
महामार्गालगतची अतिक्रमणे हटवल्यानंतर रस्त्याची उपलब्ध जागा वाढणार असून, त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होण्याची शक्यता आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत निर्माण होणारी वाहतूक कोंडी, वाहनांची अडथळ्याची स्थिती आणि पादचाऱ्यांची गैरसोय कमी होण्याची अपेक्षा आहे.
मात्र, अतिक्रमणे हटवल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण होऊ नये, यासाठी नगरपरिषदेने कायमस्वरूपी यंत्रणा उभारून नियमित देखरेख ठेवावी, अशी मागणी आता जामखेडकरांकडून होत आहे. त्यामुळे सध्या सुरू झालेली कारवाई पुढेही सातत्याने सुरू राहणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
