बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची ऐतिहासिक कामगिरी!
एकाच दिवसात ७८ पुरुषांची ‘एनएसव्ही’ बिनकटीची नसबंदी शस्त्रक्रिया यशस्वी; ग्रामीण भागातील पुरुष सहभागाचे ठरले आदर्श उदाहरण
धडगाव (प्रतिनिधी) : कुटुंब कल्याण कार्यक्रमात पुरुषांचा वाढता सहभाग अधोरेखित करणारी उल्लेखनीय कामगिरी धडगाव तालुक्यातील बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र बिलगाव येथे आयोजित विशेष ‘एनएसव्ही’ (बिनकटीची पुरुष नसबंदी) शिबिरात तब्बल ७८ लाभार्थ्यांच्या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या. ग्रामीण भागात कुटुंब नियोजनाबाबत सकारात्मक मानसिकता निर्माण होत असल्याचे हे महत्त्वपूर्ण उदाहरण मानले जात आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनवणे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कांतीलाल पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र बिलगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेंद्र पावरा आणि डॉ. ओंकार वळवी यांनी शिबिराचे नियोजन व व्यवस्थापन प्रभावीपणे केले.
एकाच दिवसात ७८ शस्त्रक्रिया
शिबिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कुशल शल्यचिकित्सक डॉ. संतोष परमार आणि डॉ. योगेश वळवी यांनी तज्ज्ञतेने एकाच दिवसात तब्बल ७८ एनएसव्ही शस्त्रक्रिया पूर्ण केल्या. शिबिरातील नियोजन, वैद्यकीय सेवा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमधील समन्वयामुळे हे उद्दिष्ट यशस्वीपणे साध्य झाले.
जिल्हाधिकाऱ्यांकडून आरोग्य पथकाचे कौतुक
आरोग्य यंत्रणेच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेटे यांनी वैद्यकीय अधिकारी, शल्यचिकित्सक तसेच आरोग्य विभागाच्या संपूर्ण पथकाचे विशेष कौतुक केले. ग्रामीण भागात कुटुंब कल्याण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना या कामगिरीमुळे बळ मिळाले आहे.
जनजागृतीला मिळाले यश
पुरुष नसबंदीबाबत असलेले गैरसमज दूर करून कुटुंब नियोजनाच्या जबाबदारीत पुरुषही सक्रियपणे सहभागी होत असल्याचे या शिबिरातून दिसून आले. महिलांप्रमाणेच पुरुषांनीही कुटुंब नियोजनाच्या निर्णयात पुढाकार घेण्याची सकारात्मक भूमिका या उपक्रमातून अधोरेखित झाली आहे.
वैद्यकीय अधिकारी, शल्यचिकित्सक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने साधलेल्या या कामगिरीचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
