वरणगावातील स्वस्त धान्य दुकानातील निकृष्ट धान्याचा मुद्दा ऐरणीवर!
नगराध्यक्ष सुनीलभाऊ काळे यांच्याकडून धान्यसाठ्याची पाहणी; जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी व कारवाईची मागणी
वरणगाव (प्रतिनिधी) : शहरातील शासकीय स्वस्त धान्य दुकानातील धान्यसाठ्याच्या गुणवत्तेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनीलभाऊ काळे यांनी स्वस्त धान्य दुकानाला भेट देऊन तेथील धान्यसाठ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी तांदळामध्ये आळी पडल्याचे, तसेच इतर काही धान्यसाठ्यातही किड लागल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले.
शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य व गरजू नागरिकांना वितरित करण्यात येणारे धान्य दर्जेदार आणि वापरण्यायोग्य असणे आवश्यक आहे. मात्र, पाहणीदरम्यान धान्याची गुणवत्ता समाधानकारक नसल्याचे आढळून आल्याने नगराध्यक्ष काळे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली.

जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या प्रकरणाची सखोल चौकशी करून धान्याचा दर्जा तपासावा आणि दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नगराध्यक्ष सुनीलभाऊ काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
तसेच नागरिकांना चांगल्या दर्जाचे धान्य मिळावे आणि भविष्यात अशा प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पुरवठा विभागाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पुरवठा अधिकाऱ्यांचीही भेट
याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याबरोबरच पुरवठा अधिकारी महेश चौधरी तसेच तालुका पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊनही निवेदन देण्यात आले. धान्याची गुणवत्ता, साठवणूक आणि लाभार्थ्यांना होणारे वितरण याबाबत योग्य ती तपासणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या प्रसंगी नगरसेवक नाना चौधरी, जनसेवक तेजस कुमार जैन, योगेश माळी, मयूर शेळके, सुनील माळी, शामराव धनगर, कुंदन माळी आणि कामगार नेते मिलिंद मेढे उपस्थित होते.
स्वस्त धान्य दुकानातील धान्याची अधिकृत तपासणी करून प्रत्यक्षात धान्य निकृष्ट असल्याचे निष्पन्न होते का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
