पळासनेरमध्ये प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्यावर अन्न प्रशासनाची धडक कारवाई
किराणा दुकानातून १ लाख २९ हजारांचा प्रतिबंधित साठा जप्त; १,१३९ पाकिटे हस्तगत, दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल
शिरपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला व तंबाखूची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन, धुळे विभागाने पळासनेर येथे धडक कारवाई केली. या कारवाईत मे. गजानन माऊली किराणा दुकानातून १,१३९ पाकिटे प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले असून, त्यांची किंमत १ लाख २९ हजार ३४१ रुपये असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


६ ऑक्टोबर २०२६ रोजी अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पळासनेर, ता. शिरपूर येथील वीरेंद्रसिंग अजितसिंग गिरासे यांच्या मे. गजानन माऊली किराणा दुकानाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला पानमसाला, गुटखा आणि तंबाखूचा साठा आढळून आला.
१,१३९ पाकिटांचा साठा जप्त
कारवाईदरम्यान आढळून आलेला प्रतिबंधित साठा पुढील कारवाईसाठी शिरपूर तालुका पोलीस स्टेशन, सांगवी येथे आणण्यात आला. तेथे या साठ्याची मोजणी करण्यात आली असता एकूण १,१३९ पाकिटे आढळून आली. या साठ्याची अंदाजे किंमत ₹१,२९,३४१ असल्याचे प्रशासनाने नमूद केले.
या प्रकरणी वीरेंद्रसिंग अजितसिंग गिरासे, रा. पळासनेर, ता. शिरपूर यांच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस स्टेशन, सांगवी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा विभागाची संयुक्त कारवाई
ही कारवाई सह आयुक्त (अन्न), नाशिक मंगेश माने आणि सहायक आयुक्त (अन्न), धुळे गोपाल माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत आनंद पवार, अभिजीत जाधव, शशिकांत राणे, अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद राऊत आणि मंगेश भावसार यांनी सहभाग घेतला.
प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व साठवणूक करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू ठेवल्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
