अंजनविहिरे गावात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धूरफवारणी
हिवतापसदृश लक्षणांचे रुग्ण आढळल्यानंतर ग्रामपंचायतीची प्रतिबंधात्मक उपाययोजना; आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार मोहीम
भडगाव प्रतिनिधी – गणेश रावळ : हिवताप, डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांना आळा घालण्यासाठी अंजनविहिरे ग्रामपंचायतीच्या वतीने गावात धूरफवारणी करण्यात आली. मागील आठवड्यात गावात हिवतापसदृश लक्षणे असलेले रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार खबरदारीचा उपाय म्हणून ही मोहीम राबविण्यात आली.
गावातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे आणि डासांचा प्रादुर्भाव कमी व्हावा, या उद्देशाने ग्रामपंचायतीने धूरफवारणीचे नियोजन केले. सरपंच चिंधा बाविस्कर, उपसरपंच प्रवीण बोरसे, ग्रामविकास अधिकारी आनंदा बोरसे, माजी सरपंच शशिकांत पाटील, माजी उपसरपंच प्रदीप पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य संभाजी पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.
धूरफवारणीचे काम जलसुरक्षक दादाजी बाविस्कर, शिपाई ज्ञानेश्वर पाटील आणि सफाई कामगार मनोज गायकवाड यांनी केले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंपरखेड येथील आरोग्य निरीक्षक संजय सोनार कळवाडीकर, आरोग्य सेवक राजरत्न जाधव, आशा स्वयंसेविका आशा पाटील व मनीषा पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नागरिकांनी घर व परिसरात पाणी साचू देऊ नये, स्वच्छता राखावी आणि तापाची लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
