YCMसह महापालिका रुग्णालयांतील भाडेतत्त्वावरील वाहनांवर प्रश्नचिन्ह
डॉक्टर-अधिकाऱ्यांच्या वापरासाठी किती खासगी वाहने? निविदा, L1 ठेकेदार, भाडे व इंधन खर्चाची माहिती जाहीर करण्याची मागणी
टिकर : YCMच्या भाडेतत्त्वावरील वाहनांचा खर्च किती? निविदा प्रक्रिया, ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या वापराची माहिती मागितली
पिंपरी : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह (YCM) अन्य महापालिका रुग्णालये आणि वैद्यकीय विभागांसाठी खासगी वाहने भाडेतत्त्वावर घेऊन वापरली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर या वाहन व्यवस्थेच्या खर्चाबाबत आणि निविदा प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. सार्वजनिक निधीतून या वाहनांवर नेमका किती खर्च होतो, वाहनांचा वापर कोण करतो आणि संबंधित करार कोणत्या प्रक्रियेतून करण्यात आला, याची सविस्तर माहिती जाहीर करावी, अशी मागणी भाजपा कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, YCMसह महापालिकेच्या विविध रुग्णालये आणि वैद्यकीय विभागांतील डॉक्टर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी तसेच अन्य अधिकाऱ्यांच्या वापरासाठी ठेकेदारामार्फत खासगी वाहने भाडेतत्त्वावर घेण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, या वाहनांची नेमकी संख्या, त्यावरील आर्थिक भार, वापराचे स्वरूप आणि संबंधित ठेकेदार याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
किती खासगी वाहने? वापर कोणाचा?
YCMसह महापालिकेच्या अन्य रुग्णालये आणि वैद्यकीय विभागांसाठी सध्या किती खासगी वाहने भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहेत, याचा विभागनिहाय तपशील जाहीर करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
प्रत्येक वाहनाचा प्रकार, कंपनी, मॉडेल आणि वाहनांची संख्या याची स्वतंत्र माहिती देण्याबरोबरच ही वाहने कोणत्या डॉक्टर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, अधिकारी किंवा विभागाच्या वापरासाठी देण्यात आली आहेत, याचाही तपशील सार्वजनिक करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निविदा झाली की थेट वाहन व्यवस्था?
खासगी वाहने भाडेतत्त्वावर घेण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती की थेट वाहन व्यवस्था करण्यात आली, याची अधिकृत माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
निविदा काढण्यात आली असल्यास निविदा क्रमांक, दिनांक, अंदाजित किंमत, मंजूर किंमत तसेच निविदेतील अटी व शर्ती उपलब्ध करून द्याव्यात. पात्र ठेकेदाराची निवड कोणत्या निकषांवर करण्यात आली आणि वाहन भाडेकरार महापालिकेच्या नियमांनुसार करण्यात आला आहे का, याचीही माहिती जाहीर करावी, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.
L1 ठेकेदार कोण? कराराचा तपशील मागविला
वाहन व्यवस्था ज्या ठेकेदार किंवा वाहतूकदारामार्फत करण्यात आली आहे, त्या L1 ठेकेदाराचे नाव, कराराची मुदत, मंजुरीचा तपशील आणि संबंधित कामासाठी करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदीची माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच प्रत्येक वाहनासाठी प्रतिदिन किंवा प्रतिमहिना किती भाडे अदा केले जाते, याची माहिती देण्याबरोबरच चालकाचा पगार, इंधन, वाहन देखभाल, दुरुस्ती आणि अन्य अनुषंगिक खर्च कोणाच्या जबाबदारीचा आहे, याचाही तपशील जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सार्वजनिक निधी असल्याने पारदर्शकता आवश्यक
महापालिकेच्या रुग्णालयांशी संबंधित वाहन व्यवस्थेवर सार्वजनिक निधीतून खर्च होत असल्याने या खर्चाचा प्रत्येक घटक स्पष्ट आणि पारदर्शक असणे आवश्यक असल्याची भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.
रुग्णालयीन सेवा, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि रुग्णांच्या सुविधांवर महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असताना वाहन भाडेव्यवस्थेतील आर्थिक व्यवहारही नियमबद्ध पद्धतीने होत आहेत का, याची माहिती नागरिकांसमोर येणे आवश्यक असल्याचे काळभोर यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, निवेदनात कोणत्याही व्यक्ती किंवा ठेकेदारावर थेट गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आलेला नसून, वाहनांची संख्या, वापर, निविदा प्रक्रिया, L1 ठेकेदार, भाडे, करार, इंधन आणि देखभाल खर्च यांची अधिकृत माहिती उपलब्ध करून देऊन आवश्यक ती चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आता महापालिका प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते आणि YCMसह अन्य महापालिका रुग्णालयांमध्ये भाडेतत्त्वावरील वाहनांवर नेमका किती सार्वजनिक निधी खर्च होतो, याची अधिकृत माहिती कधी जाहीर होते, याकडे लक्ष लागले आहे.
