मनमाडच्या डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रमाचा ७५ वा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा होणार!
१७ नोव्हेंबरला विविध कार्यक्रमांचे आयोजन; प्रवेशद्वार व सभागृहाचे उद्घाटन, व्याख्यान आणि भीमगीतांचा कार्यक्रम होणार
मनमाड, प्रतिनिधी : कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांच्या पुढाकारातून उभ्या राहिलेल्या डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रम, मनमाड या ऐतिहासिक वसतिगृहाचा ७५ वा अमृतमहोत्सव १७ नोव्हेंबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या अमृतमहोत्सवानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, त्याच्या नियोजनासाठी ३० सप्टेंबर २०२६ रोजी वसतिगृहात बैठक घेण्यात आली.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या वसतिगृह स्थापनेच्या संकल्पनेतून प्रेरणा घेत कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रमाची उभारणी केली. १४ जानेवारी १९३३ रोजी स्थापन झालेल्या या वसतिगृहाचे उद्घाटन १७ नोव्हेंबर १९५१ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या आग्रहास्तव बाबासाहेबांनी या वसतिगृहाचे उद्घाटन केले होते. या ऐतिहासिक घटनेला १७ नोव्हेंबर २०२६ रोजी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.
अमृतमहोत्सवाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत दिवसभरातील कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी वसतिगृहाकडे जाणाऱ्या दोन्ही प्रवेशद्वारांचे तसेच सभागृहाचे उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासोबतच कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर व्याख्यान, भीमगीतांचा कार्यक्रम आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
वसतिगृहाच्या जागेत आयटीआय व नर्सिंग कॉलेज उभारण्याचा मानस
बैठकीदरम्यान संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन कुणाल गायकवाड यांनी वसतिगृहाच्या जागेत आयटीआय महाविद्यालय आणि नर्सिंग कॉलेज उभारण्याचा मानस व्यक्त केला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
या बैठकीला संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन कुणाल गायकवाड, उपाध्यक्ष प्रकाश सोनवणे, वसतिगृह अधीक्षक राहुल घोडेराव, समाजसेवक महेंद्र गरुड, मयूर बोरसे, राजाभाऊ अहिरे, रवींद्र घोडेस्वार, पी. आर. निळे, प्रवीण पगारे, अशोक पाईकराव, संतोष अहिरे, अॅड. सुधाकर मोरे, सिद्धांत पाटील, कैलास अहिरे आणि रवींद्र गरुड आदी उपस्थित होते.
अमृतमहोत्सवाच्या माध्यमातून वसतिगृहाचा ऐतिहासिक वारसा, महापुरुषांचे विचार आणि शैक्षणिक प्रगतीचा संकल्प नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. बैठकीच्या शेवटी संस्थेच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
