लंडनमध्ये सुमा नायरची यशाची भरारी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे सत्कार
मिडलसेक्स विद्यापीठातून एमबीएमध्ये डिस्टिंक्शन; बर्कले लंडन हेडक्वार्टरमध्ये सिस्टीम इंजिनिअर म्हणून निवड
धरणगाव, प्रतिनिधी : धरणगाव येथील कु. सुमा सेलवा नायर हिने लंडनमधील मिडलसेक्स विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण पूर्ण करत डिस्टिंक्शन मिळविले आहे. यानंतर बर्कले लंडन हेडक्वार्टर या कंपनीत सिस्टीम इंजिनिअर म्हणून तिला नोकरीची संधी मिळाली आहे. तिच्या या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन आणि पेढे भरवून सत्कार करण्यात आला.
या सत्कारप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, सेवानिवृत्त प्रा. के. के. गायकवाड, धरणगाव तालुका कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, उपाध्यक्ष रमेश महाजन, जिल्हा युवक कार्याध्यक्ष मोहित पवार, शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, सचिव नंदूनाना धनगर, ज्येष्ठ नेते अमित शिंदे, अमोल हरपे, तालुकाध्यक्ष परेश गुजर, शहराध्यक्ष जुनेद बागवान, संघटक प्रफुल्ल पवार यांच्यासह सेलवा नायर, उन्नी नायर आणि सत्यभामा नायर उपस्थित होते.
बी.टेक.पासून लंडनमधील एमबीएपर्यंतचा प्रवास
कु. सुमा नायर ही धरणगाव येथील क्लिफ टेलरचे संचालक सेलवा नायर आणि सत्यभामा नायर यांची कन्या आहे. तिने शिरपूर येथील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बी.टेक.चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई येथे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काही वर्षे काम केले.
व्यावसायिक अनुभव घेतल्यानंतर तिने एमबीए करण्याचा निर्णय घेतला आणि लंडनमधील मिडलसेक्स विद्यापीठात प्रवेश मिळविला. तेथे अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करत तिने डिस्टिंक्शन मिळवले. त्यानंतर लंडनमध्येच सिस्टीम इंजिनिअर म्हणून नोकरीची संधी मिळाल्याने तिच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासात महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.
कुटुंबीयांच्या पाठिंब्याला गुणवत्तेची जोड
सेलवा नायर हे मूळचे केरळचे असून गेल्या सुमारे ४० वर्षांपासून धरणगावात स्थायिक आहेत. टेलरिंग व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करत मुलीच्या उच्च शिक्षणासाठी पाठबळ दिले. सुमा हिने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर परदेशात उच्च शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळविल्याने नायर कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
सुमा नायरच्या यशामुळे धरणगावच्या शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात तिचे अभिनंदन होत आहे. तिच्या यशाचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, मेहनत, सातत्य आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्याच्या बळावर ध्येय गाठता येते, याचे उदाहरण तिच्या वाटचालीतून समोर आले आहे.
