पत्रकार वसाहत आणि पत्रकार भवनासाठी प्रयत्न करणार! — आमदार किशोर पाटील
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय अधिवेशनात ग्वाही; पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार
पाचोरा, प्रतिनिधी : पत्रकारांच्या समस्या, मागण्या आणि त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून, पत्रकार वसाहत आणि तालुकास्तरावर पत्रकार भवन उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पाचोरा येथे आयोजित उत्तर महाराष्ट्रस्तरीय अधिवेशनात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन आणि अधिकृत पत्रकारांची यादी सादर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्रस्तरीय अधिवेशन शनिवार, दि. १० ऑक्टोबर रोजी पाचोरा येथे उत्साहात पार पडले. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, पाचोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुनीताताई किशोर पाटील, अहिराणी रील स्टार सचिन कुमावत, विद्या भाटिया (तोंडाय आक्का), नगरसेवक प्रवीण ब्राह्मणे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते.

पत्रकारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
अध्यक्षीय भाषणात आमदार किशोर पाटील म्हणाले की, पत्रकारांच्या विविध समस्या आणि मागण्यांची आपल्याला जाणीव आहे. पत्रकार संघाला आपण आपला परिवार मानतो आणि त्यांच्या हितासाठी काहीतरी करण्याची आपली प्रामाणिक इच्छा आहे. मात्र, सध्या प्रिंट, सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील पत्रकारांची संख्या वाढत असल्याने शासकीय योजनांचा लाभ पात्र पत्रकारांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकृत यादी तयार करणे आवश्यक आहे.
पत्रकारांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आणि अधिकृत पत्रकारांची यादी सादर करावी. त्यानंतर संबंधित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. पत्रकार वसाहत आणि पत्रकार भवनासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘लाडका पत्रकार’ योजना सुरू करण्याची मागणी
कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शनात प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पत्रकारांच्या सुख-दुःखात सहभागी होणारी आणि सामाजिक बांधिलकी जपणारी संघटना असल्याचे त्यांनी सांगितले. विविध क्षेत्रांतील गुणवंत व्यक्ती, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकारांचा सन्मान करण्याबरोबरच जनहिताचे उपक्रम संघटनेच्या माध्यमातून राबविले जातात, असे त्यांनी नमूद केले.
राज्य सरकारने पत्रकार पेन्शन योजना जाहीर केली असली, तरी अनेक पत्रकारांना तिचा लाभ मिळत नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. पात्र पत्रकारांना पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच, राज्य सरकारने लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनांच्या धर्तीवर ‘लाडका पत्रकार’ योजना सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली. पत्रकार वसाहतीसाठी तसेच तालुकास्तरावर पत्रकार भवनासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
अपघातग्रस्त पत्रकारांना आर्थिक मदत; सामाजिक उपक्रमांचे कौतुक
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पाचोरा येथील पदाधिकाऱ्यांकडून दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत विविध विधायक उपक्रम राबविले जात असल्याचे आरोटे यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, वंचित ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान, पत्रकारांसाठी अपघात विमा आणि अपघातग्रस्त पत्रकारांना मदत अशा उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
या कार्यक्रमात प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या पत्नी ॲड. कविता रायसाकडा यांनी तीन अपघातग्रस्त पत्रकारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली. या उपक्रमातून पत्रकारांप्रती सामाजिक बांधिलकी आणि सहकार्याची भावना दिसून येते, असे आरोटे यांनी सांगितले.
पत्रकारांना मार्गदर्शन करताना त्यांनी जबाबदार पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले. पत्रकारितेतील लिखाणामुळे कोणाचेही जीवन विनाकारण उद्ध्वस्त होणार नाही, याची काळजी घेत सत्याधारित आणि समाजहिताचे लिखाण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उत्सवावरील खर्च टाळणार
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करत आमदार किशोर पाटील यांनी शिवसेनेच्या वतीने साजरा होणारा दुर्गोत्सव आणि १ नोव्हेंबर रोजीचा स्वतःचा वाढदिवस साजरा करणार नसल्याची घोषणा केली. या उत्सवांवरील खर्च टाळून ती रक्कम शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री निधीत जमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असल्याचे नमूद करत त्यांनी पाणी अडवा, पाणी जिरवा या विषयावर जनजागृती करणारे लिखाण करण्याचे आवाहन पत्रकारांना केले. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक पावले उचलण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार संघटनेच्या कार्याचा आढावा
प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत पदाधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. अहिराणी रील स्टार सचिन कुमावत यांनी पाचोरा शहरातील पत्रकार कलाकारांवर प्रेम करणारे असल्याचे सांगत संघटनेच्या विधायक उपक्रमांना सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.
कार्यक्रमाला संघटनेचे विभागीय अध्यक्ष समाधान मैराळे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रा. विजय गाढे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, मराठवाडा विभागीय संपर्कप्रमुख कुंडलिक वाळेकर, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख विजय शेळके, पत्रकार सचिन सोमवंशी आदी उपस्थित होते.
अधिवेशन यशस्वी करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने, उपाध्यक्ष राकेश सुतार, उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद कोळी, खान्देश विभागीय उपाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रावेर विधानसभा सुरेश पवार, जिल्हा सचिव मनिष सोनवणे, पत्रकार हल्ला कृती समितीचे अध्यक्ष प्रल्हाद पवार, पाचोरा तालुकाध्यक्ष गौतम सोनवणे, भडगाव तालुकाध्यक्ष रतिलाल पाटील आणि अमळनेर तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. ज्येष्ठ पत्रकार अयाज मोहसिन यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रवीण ब्राह्मणे यांनी आभार मानले.
