नांदगावच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा भेट!
पेपर फीच्या चर्चेदरम्यान लक्षात आली प्रतिमेची उणीव; विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत जपला महामानवांच्या विचारांचा वारसा
नांदगाव, प्रतिनिधी | प्रज्ञानंद जाधव
शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव, संविधानिक मूल्ये आणि महामानवांविषयी आदरभाव जपणारा प्रेरणादायी उपक्रम नांदगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी राबविला. महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा नसल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे पुढाकार घेत प्राचार्य डॉ. एन. यू. पाटील यांच्याकडे बाबासाहेबांची प्रतिमा भेट दिली.
महाविद्यालयातील काही विद्यार्थी परीक्षा शुल्कासंदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी प्राचार्य डॉ. एन. यू. पाटील यांच्या दालनात गेले होते. यावेळी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना मार्गदर्शन केले. चर्चेदरम्यान महाविद्यालयाच्या दालनात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा नसल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकमताने बाबासाहेबांची प्रतिमा महाविद्यालयाला भेट देण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार प्राचार्य डॉ. एन. यू. पाटील तसेच सर्व वर्गशिक्षक आणि विभागप्रमुखांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी महामानवांविषयीचा आदर व्यक्त करण्यासोबतच शिक्षण, समता आणि संविधानिक मूल्यांप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. त्यांच्या विचारांचा जागर शैक्षणिक परिसरात कायम राहावा आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश होता. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे प्राचार्यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची भावना रुजविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
या स्तुत्य उपक्रमात विशाल पहान, ऋषिकेश निकम, दीपक अंभोरे, शुभम शेजवळ, अबीत खान, यश सोनवणे आणि साहिल मोरे या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांच्या या कृतीतून शिक्षणासोबत सामाजिक भान जपण्याचा आणि महामानवांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला.
