टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत नवीन वीज उपकेंद्र लवकरच मंजूर करणार!
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा; पथराड–पाळधी खुर्द ३३/११ केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचा विश्वास; नाला खोलीकरण, जलसंधारण व शेतरस्त्यांच्या कामांना प्राधान्य
पाळधी/धरणगाव/जळगाव, प्रतिनिधी | दि. १२ ऑक्टोबर
धरणगाव : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळेल, असा विश्वास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. यासोबतच धरणगाव तालुक्यातील टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत नवीन वीज उपकेंद्र लवकरच मंजूर करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नाला खोलीकरण, जलसंधारण, पाणी अडविणे आणि शेतरस्त्यांच्या कामांनाही प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धरणगाव तालुक्यातील पथराड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ३३/११ केव्ही पथराड–पाळधी खुर्द वीज उपकेंद्राचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या उपकेंद्रामुळे परिसरातील गावांमधील घरगुती वीज ग्राहकांसह शेतीपंपांना अधिक सक्षम आणि सुरळीत वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे.

अनेक गावांतील शेतकऱ्यांना दिलासा
पथराड–पाळधी खुर्द वीज उपकेंद्रामुळे पथराड गावठाण फीडरअंतर्गत पथराड, धार आणि शेरी या गावांना लाभ होणार आहे. तर दोनगाव गावठाण फीडरअंतर्गत टहाकळी, फुलपाट, आव्हाणी, भोकणी, दोनगाव तसेच पाळधी खुर्द येथील सागर कॉलनी परिसराला अधिक सक्षम वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.
याशिवाय पथराड शेती फीडरअंतर्गत निमखेडे–झुरखेडा शिवार, पथराड, पाळधी खुर्द, टहाकळी आणि फुलपाट परिसरातील शेतीपंपांनाही या उपकेंद्राचा लाभ मिळणार आहे. वीजपुरवठ्याची क्षमता वाढल्याने शेतकऱ्यांना सिंचनाचे नियोजन करणे अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज देण्यावर भर
पालकमंत्री पाटील म्हणाले की, दुष्काळाच्या काळात पाण्याबरोबरच शेतीसाठी नियमित वीजपुरवठा होणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे. विजेची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महावितरणने रोहित्रांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. तांत्रिक बिघाडामुळे शेतकऱ्यांचा वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
दुष्काळी परिस्थितीत जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणे आवश्यक असून, नाला खोलीकरण, पाणी अडविणे आणि शेतरस्त्यांच्या कामांमुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाई कमी करण्यासह शेतीच्या कामांना मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

सूतगिरणी आणि चॉकलेट उद्योगातून रोजगाराच्या संधी
धरणगाव तालुक्यात विकासकामांसोबत ग्रामीण भागात उद्योग उभारण्यावरही भर दिला जात असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. तालुक्यात प्रस्तावित सूतगिरणीच्या कामाला दिवाळीपर्यंत सुरुवात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय परिसरात चॉकलेट निर्मितीचा उद्योगही लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या उद्योगांमुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, पथराड–पाळधी खुर्द वीज उपकेंद्राचे काम निर्धारित मुदतीत पूर्ण केल्याबद्दल पालकमंत्री पाटील यांनी मे. गार्गी इलेक्ट्रिकलच्या ठेकेदारांचे कौतुक केले.
मान्यवरांची मनोगते
कार्यक्रमात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते डी. जी. पाटील, पी. एम. पाटील आणि भगवान महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक अभियंता लोकेश चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सहायक अभियंता रत्ना पाटील यांनी केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार, युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते डी. जी. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. पाटील, गार्गी इलेक्ट्रिकलच्या यामिनी नारखेडे, शिवसेनेचे पी. एम. पाटील, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, भाजप तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, ॲड. संजय महाजन, भगवान महाजन, सचिन पवार, रवी चव्हाण, संजय पाटील, माजी सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, गोकुळ लंके, श्रीकांत चव्हाण, दिलीप पाटील, किशोर झंवर, अनिल कासट यांच्यासह परिसरातील सरपंच, शेतकरी, विविध पक्षांचे पदाधिकारी, महावितरणचे अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
