जगवानी नगरच्या रहिवाशांसाठी उद्योजक राजेंद्र पाटील यांचा पुढाकार; स्वतःच्या प्लॉटमधून देणार रस्ता!
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा; मुख्य प्रवेशद्वाराला ‘सुमेर सिंग’ नाव देण्याचा मानस
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव एमआयडीसी परिसरातील जगवानी नगर येथील रहिवाशांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला येण्या-जाण्याच्या रस्त्याचा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्योजक तथा मन्यारखेडा गावचे माजी सरपंच राजेंद्र भगवान पाटील (राजुभाऊ) यांनी यासाठी पुढाकार घेत स्वतःच्या मालकीच्या प्लॉटमधून रस्ता उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
राजेंद्र पाटील यांनी एमआयडीसी परिसरातील संबंधित प्लॉट सर्वाधिक बोली लावून विकत घेतला आहे. या प्लॉटमधून जगवानी नगरमधील रहिवाशांना येण्या-जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या मार्गाच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘सुमेर सिंग’ असे नाव देण्याचाही मानस व्यक्त करण्यात आला आहे.
सामाजिक बांधिलकीचे उदाहरण
स्वतःच्या मालकीच्या जागेचा उपयोग नागरिकांच्या सोयीसाठी करण्याच्या या निर्णयाचे जगवानी नगर परिसरात स्वागत होत आहे. संपत्तीचा उपयोग केवळ वैयक्तिक हितासाठी न करता समाजाच्या गरजांसाठीही करता येतो, ही भावना या निर्णयातून व्यक्त होत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.
“खरी श्रीमंती संपत्तीत नसून समाजासाठी केलेल्या कार्यात असते,” अशी भावना यानिमित्ताने व्यक्त करण्यात आली. समाजाच्या हितासाठी पुढाकार घेण्याच्या या भूमिकेमुळे रहिवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
रहिवाशांकडून आभार व कृतज्ञता
रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल जगवानी नगरमधील रहिवासी आणि ज्येष्ठ नागरिकांनी राजेंद्र भगवान पाटील यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
विनीत मनोज सुरवाडे आणि समस्त जगवानी नगर रहिवासी परिवाराच्या वतीने राजेंद्र पाटील यांचे आभार मानण्यात आले. “राजुभाऊ, आपल्या स्तुत्य निर्णयाला सलाम! धन्यवाद राजुभाऊ!” अशा शब्दांत रहिवाशांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नावर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाल्याने जगवानी नगरमधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
