धुळ्यात ६५ वर्षांच्या शिवस्मारकाला सन्मानपूर्वक निरोप; नव्या भव्य स्मारकाची उभारणी सुरू!
सकल मराठा समाजाच्या उपस्थितीत जुन्या स्मारकाचे पूजन व माल्यार्पण; आगामी शिवजयंती नव्या स्मारकस्थळी साजरी करण्याचा निर्धार
धुळे | प्रतिनिधी
धुळे शहराची शान आणि शिवप्रेमींचे प्रेरणास्थान असलेल्या मनोहर टॉकीजसमोरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला तब्बल ६५ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. १९६२ मध्ये तत्कालीन नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेले हे स्मारक शिवजयंती उत्सव, विविध मोर्चे आणि न्याय्य मागण्यांसाठीच्या आंदोलनांचे महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. आता या ऐतिहासिक स्मारकाचे आधुनिक, आकर्षक आणि देखण्या स्वरूपात नूतनीकरण करण्यात येत असून, जुन्या स्मारकाला शिवप्रेमींच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.
आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांच्या पुढाकारातून आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून नव्या स्मारकाचे काम सुरू आहे. नव्या स्मारकाची रचना ऐतिहासिक वारसा जपणारी आणि मनमोहक असल्याने या कामाबद्दल शिवप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
जुन्या स्मारकाच्या आठवणींनी शिवप्रेमी भावूक
छत्रपती शिवाजी महाराज हे अठरापगड जातींचे श्रद्धास्थान, स्वाभिमानाचे प्रतीक आणि प्रेरणास्रोत आहेत. त्यामुळे मनोहर टॉकीजसमोरील स्मारकाला धुळेकरांच्या भावविश्वात विशेष स्थान आहे. अनेक वर्षे या स्मारकाच्या साक्षीने शिवजयंती उत्सव साजरे झाले, तर विविध सामाजिक प्रश्नांवर न्याय मागण्यासाठी आंदोलनेही याच ठिकाणाहून सुरू झाली.
नव्या स्मारकाच्या उभारणीसाठी जुने स्मारक हटविण्यापूर्वी सकल मराठा समाज, धुळे जिल्ह्याच्या प्रमुख समन्वयकांच्या उपस्थितीत त्याचे पावित्र्य जपत दुग्धाभिषेक, स्वच्छता, माल्यार्पण आणि पूजन करण्यात आले. या वेळी अनेक शिवभक्त जुन्या स्मारकाशी जोडलेल्या आठवणींमुळे भावूक झाले. काहींच्या डोळ्यांत अश्रू तरळले. जुन्या स्मारकाबद्दलची कृतज्ञता आणि नव्या स्मारकाबद्दलची अपेक्षा अशा संमिश्र भावना यावेळी व्यक्त झाल्या.
नव्या स्मारकात इतिहास आणि आधुनिकतेचा संगम
शहरातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती आणि लहान मुलांनाही अभिमान वाटेल, अशा स्वरूपात नव्या स्मारकाची उभारणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आधुनिक रचना आणि ऐतिहासिक आशय यांचा सुंदर संगम साधणारे हे स्मारक धुळे शहराच्या वैभवात भर घालेल, अशी अपेक्षा शिवप्रेमींनी व्यक्त केली.
आगामी शिवजयंतीपूर्वी नव्या स्मारकाचे काम पूर्ण होऊन त्याच ठिकाणी भव्य शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येईल, असे सकल मराठा समाज, धुळे जिल्ह्याच्या वतीने जाहीर करण्यात आले. या कामासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांचे समाजाच्या वतीने आभारही व्यक्त करण्यात आले.
सन्मानपूर्वक हटविण्यात आले जुने स्मारक
पूजन आणि माल्यार्पणानंतर जुने स्मारक त्या ठिकाणाहून सन्मानपूर्वक हटविण्यात आले. जुन्या स्मारकाच्या ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्वाची जाणीव ठेवून हा कार्यक्रम पार पडला. जुन्या स्मारकाच्या आठवणी जपत नव्या स्मारकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
या वेळी सकल मराठा समाज, धुळे जिल्ह्याचे भानुदास बगदे, सुधाकर बेंद्रे, विनोद जगताप, विकास बाबर, महानगरपालिकेचे मुख्य अभियंता रावसाहेब चंद्रकांत उगले, मनोज ढवळे, रंजीत राजे भोसले, नगरसेवक राजेश पवार, अॅड. राजू गुजर सर, अॅड. नितीन पाटील, अॅड. सुनील ठाणगे, भानुदास चौधरी, किशोर वाघ, प्रभाकर वाघ, श्रीरंग जाधव, श्याम निरगुडे, प्रफुल माने, सुनील वर्पे, राजेंद्र चव्हाण, अशोक बाबर, उल्हास पाटील यांच्यासह अनेक शिवभक्त आणि सकल मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
