कुऱ्हा हरदो शाळेच्या शिक्षिका कुमुदिनी माहुरे यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड!
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गणितीय पार्क मॉडेलला प्रथम क्रमांक; विद्यार्थ्यांच्या कल्पक सादरीकरणाचेही कौतुक
बोदवड प्रतिनिधी : पंचायत समिती बोदवड अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२६-२७ मध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कुऱ्हा हरदो येथील शिक्षिका श्रीमती कुमुदिनी विनायकराव माहुरे यांनी उच्च प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी ‘गणितीय प्रतिकृती आणि संगणकीय विचारसरणी’ या विषयावर आधारित गणितीय पार्क मॉडेल सादर केले. या यशामुळे त्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांना गणितातील विविध संकल्पना एकाच दृष्टिक्षेपात सहज आणि सोप्या भाषेत समजाव्यात, या उद्देशाने माहुरे यांनी गणितीय पार्क मॉडेल तयार केले. या अभिनव शैक्षणिक संकल्पनेला तालुकास्तरीय प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाल्याने शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची दखल घेतली गेली आहे.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
पंचायत समिती बोदवड अंतर्गत गटसाधन केंद्र आणि रोज पेटल्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बोदवड यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि नावीन्यपूर्ण प्रयोगांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोदवड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मिठूलाल अग्रवाल होते. सरस्वती माता आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
गटशिक्षणाधिकारी अनिता परमार यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावण्याबरोबरच अभ्यासासोबत त्यांच्या कलागुणांनाही वाव द्यावा, असे मार्गदर्शन केले.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी हरी नानकर, तालुका विज्ञान समन्वयक वनिता अग्रवाल, शेलवड केंद्राच्या केंद्रप्रमुख प्रतिमा चौधरी, बीआरसी विषयतज्ज्ञ संगीता शेळके व भारती पाटे, शाळेचे प्राचार्य अरविंद वाघ तसेच तालुक्यातील विज्ञान शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थिनींचे नावीन्यपूर्ण सादरीकरण
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कुऱ्हा हरदो येथील विद्यार्थिनींनीही विविध विषयांवर आधारित सादरीकरण केले.
इयत्ता सहावीतील प्रगती माळी, देवयानी सोनवणे आणि मोहिनी सोनवणे यांनी ‘हरित ऊर्जा व पर्यावरण संवर्धन’ या विषयावर, तर इयत्ता सातवीतील दीक्षा इंगळे, जोगेश्वरी माळी आणि पूजा पाटील यांनी ‘गणितीय प्रतिकृती आणि संगणकीय विचारसरणी’ या विषयावर आधारित सादरीकरण केले.
या विद्यार्थिनींना शिक्षिका कुमुदिनी माहुरे आणि डॉ. वैशाली संसारे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींनी विज्ञान व गणितातील संकल्पना सर्जनशील पद्धतीने मांडल्याने त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले.
शिक्षकवृंदाकडून अभिनंदन
या यशासाठी शेलवड केंद्राच्या केंद्रप्रमुख प्रतिमा चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी हरी नानकर आणि शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक गजानन कोठाळे यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेतील शिक्षिका पुनम वाघोदे, शिक्षक योगेश बोरोले, छाया बहुरूपे, नितीन लांडे आणि डॉ. वैशाली संसारे यांनी कुमुदिनी माहुरे यांचे अभिनंदन केले. त्यांच्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील सहभागाबाबत शाळा परिवारात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
