भुसावळवर शोककळा! नगरपरिषदेचे आस्थापना प्रमुख वैभव पवार यांचा भीषण अपघातात मृत्यू
बहिणीची प्रकृती चिंताजनक; गोदावरी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू
भुसावळ | प्रमोद पाटील, प्रतिनिधी
भुसावळ नगरपरिषदेचे आस्थापना प्रमुख वैभव पवार यांचे शनिवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. या अपघातात त्यांच्यासोबत प्रवास करणारी त्यांची बहीण गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर गोदावरी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे भुसावळ नगरपरिषद प्रशासनासह संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे.
शिवपूर-कन्हाळे रोडवर भीषण अपघात
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वैभव पवार हे शनिवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजता रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होते. दरम्यान, शिवपूर-कन्हाळे रोडवरील कुकरेजा सुपरमार्टसमोर त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने वैभव पवार यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
बहीण गंभीर जखमी; अतिदक्षता विभागात उपचार
अपघाताच्या वेळी वैभव पवार यांच्यासोबत त्यांच्या बहीणही वाहनात प्रवास करत होत्या. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
नगरपरिषद प्रशासनात हळहळ
वैभव पवार यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच भुसावळ नगरपरिषदेतील अधिकारी, कर्मचारी, महसूल विभागातील सहकारी आणि नागरिकांमध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने नगरपरिषद प्रशासनाची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत असून, शहरातील विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
