परभणी शहरात आता तीन स्वतंत्र तलाठी सजे!
महसुली सेवा होणार गतिमान; जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांची मंजुरी
परभणी | प्रतिनिधी – रामचंद्र अन्नदाते
परभणी शहरातील नागरिकांना महसुली सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरासाठी यापूर्वी कार्यरत असलेल्या एकाच तलाठी सजाचे विभाजन करून आता तीन स्वतंत्र तलाठी सजे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
एकाच तलाठी सजामुळे नागरिकांना अडचणी
यापूर्वी संपूर्ण परभणी शहराचा महसुली कारभार एकाच तलाठी सजामार्फत चालत होता. त्यामुळे सातबारा उतारे, फेरफार नोंदी, विविध दाखले आणि इतर महसुली कागदपत्रांसाठी नागरिक व शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत होती. नव्या निर्णयामुळे शहरातील महसुली कारभाराचे विकेंद्रीकरण होऊन या कामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.
परभणी पूर्व, पश्चिम आणि गावठाण असे तीन सजे
नवीन रचनेनुसार परभणी पूर्व, परभणी पश्चिम आणि परभणी गावठाण असे तीन स्वतंत्र तलाठी सजे निर्माण करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांची महसुली कामे अधिक वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार असून प्रशासन आणि नागरिकांमधील समन्वयही वाढणार आहे.
१५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान दस्तनोंदणी व ऑनलाइन फेरफार नोंदी बंद
दरम्यान, या तीन नवीन तलाठी सजांची ई-फेरफार संगणकीय प्रणालीमध्ये निर्मिती करण्यासाठी १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२६ या कालावधीत दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणी तसेच तलाठी स्तरावरील ऑनलाइन फेरफार नोंदी पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. या कालावधीत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांनी केले आहे.
शहराची वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाचा विस्तार लक्षात घेता हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. तीन स्वतंत्र तलाठी सजांमुळे परभणीकरांना महसुली सेवा अधिक सुलभ आणि गतिमान पद्धतीने मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
