गरजू कुटुंबांच्या घरात दिवाळीचा आनंद; श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचा स्तुत्य उपक्रम!
भुसावळात गरीब वस्त्यांमध्ये फराळ वाटप; महाराणा प्रताप चौकात पहिला दिवा प्रज्वलित करून दिवाळीचा शुभारंभ
भुसावळ | प्रमोद पाटील
सामाजिक बांधिलकी जपत श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने भुसावळ शहरातील गरीब व गरजू वस्त्यांमध्ये दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा आणि गरजू कुटुंबांनाही दिवाळीचा गोडवा अनुभवता यावा, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
पदाधिकाऱ्यांसह समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
या फराळ वाटप उपक्रमात करणी सेनेचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष दामोदर राजपूत, जिल्हाध्यक्ष संदीप राणा, महिला जिल्हाध्यक्ष सारिकाताई पाटील, प्रदेश सचिव आनंदा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मीनाताई पाटील, जिल्हा सचिव कविताताई पाटील, भुसावळ तालुका अध्यक्ष जयश्रीताई पाटील, शहराध्यक्ष प्रतीक्षा पाटील, भुसावळ तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, ग्रामीण अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह सुनील पाटील, दयानंद पाटील, गणेश पाटील, शारदा पाटील, अर्चना पाटील, श्रद्धा पाटील आणि असंख्य समाजबांधव सहभागी झाले होते.

‘पहिला दिवा महाराणा प्रताप यांच्या स्मारकावर’
गरजू वस्त्यांमध्ये फराळ वाटप पूर्ण झाल्यानंतर करणी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते वसंत टॉकीजजवळील महाराणा प्रताप चौकात एकत्र आले. यावेळी ‘पहिला दिवा महाराणा प्रताप यांच्या स्मारकावर, मग आपल्या घरी दिवाळी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला.
महाराणा प्रताप यांच्या स्मारकाला विनम्र अभिवादन करून तेथे पहिला दिवा प्रज्वलित करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी दिवाळी सणाचा शुभारंभ उत्साहात केला.
गरजू कुटुंबांपर्यंत सणाचा आनंद पोहोचविण्याबरोबरच महापुरुषांच्या स्मृतींना अभिवादन करून दिवाळी साजरी करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या या सामाजिक उपक्रमाचे भुसावळ शहरात कौतुक होत आहे.
