आचेगावात आठ वर्षीय बालकाला पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा!
दवाखान्याचे हँडबिल लावण्याच्या बहाण्याने गावात आलेल्या अज्ञात व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली; नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस
भुसावळ : संघरत्न सपकाळे
भुसावळ तालुक्यातील आचेगाव येथे आठ वर्षीय बालकाला दुचाकीवर बसवून घेऊन जाण्याचा अज्ञात व्यक्तीने प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडलेल्या या संशयास्पद प्रकारामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हँडबिल लावण्याच्या बहाण्याने संशयास्पद हालचाली
स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक अज्ञात व्यक्ती दवाखान्याचे हँडबिल लावण्याच्या बहाण्याने गावात आली होती. याचदरम्यान एका आठ वर्षीय बालकाला हँडबिल लावण्याच्या कारणाने आपल्या दुचाकीवर बसवून घेऊन जाण्याचा प्रयत्न होत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले.
नागरिकांनी प्रसंगावधान राखत संबंधित व्यक्तीला तातडीने विचारणा केली. ‘या लहान मुलाला कुठे घेऊन जात आहात?’ असा प्रश्न विचारताच संबंधित व्यक्ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांनी त्याची ओळख विचारली असता, आपण एका पत्रकाराचे भाऊ असल्याचे त्याने सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
अनेक प्रश्न अनुत्तरित; पोलिसांकडून चौकशीची अपेक्षा
संबंधित व्यक्तीचा गावात येण्यामागील नेमका उद्देश काय होता? बालकाला दुचाकीवरून कुठे घेऊन जाण्याचा प्रयत्न होता? त्याने सांगितलेली ओळख खरी होती का? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत.
या प्रकाराची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन संबंधित व्यक्तीची ओळख पटवावी, घटनेची सत्यता तपासावी आणि वस्तुस्थिती नागरिकांसमोर आणावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
पालकांनो, मुलांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहा!
लहान मुलांना अनोळखी व्यक्तींकडून खाऊ, खेळणी, वस्तू किंवा अन्य आमिष दाखवून जवळ करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी मुलांना अनोळखी व्यक्तीसोबत कुठेही न जाण्याची स्पष्ट सूचना द्यावी. शाळेत जाताना, खेळताना किंवा घराबाहेर असताना मुलांवर योग्य लक्ष ठेवणेही आवश्यक आहे.
नागरिकांची सतर्कता महत्त्वाची असली, तरी बालसुरक्षेच्या बाबतीत कोणताही धोका पत्करणे परवडणारे नाही. या घटनेची अधिकृत चौकशी होऊन सत्य परिस्थिती स्पष्ट होणे गरजेचे आहे.
