हक्काच्या थकीत पैशांसाठी सेवानिवृत्त मनपा कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न!
आठ वर्षांपासून वेतन व ग्रॅच्युइटीची लाखो रुपयांची रक्कम थकीत; मनपा प्रवेशद्वारावर पेट्रोल ओतून आंदोलन, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत अनर्थ टाळला
धुळे (प्रतिनिधी) : आठ वर्षांपासून प्रलंबित असलेली वेतनाची थकबाकी आणि ग्रॅच्युइटीची रक्कम मिळत नसल्याने संतप्त झालेल्या धुळे महानगरपालिकेच्या तीन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मनपा प्रवेशद्वारासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. भानुदास बगदे, मुकुंद शिंदे आणि सुरेश आत्माराम पाटील यांनी पेट्रोलची बाटली आणून अंगावर पेट्रोल ओतण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला.
आठ वर्षांपासून लाखो रुपयांची रक्कम थकीत
भानुदास बगदे, मुकुंद शिंदे आणि सुरेश आत्माराम पाटील हे तिघेही धुळे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते. सुमारे आठ वर्षांपूर्वी ते सेवेतून निवृत्त झाले. मात्र, निवृत्तीनंतर मिळणे अपेक्षित असलेले वेतनाचे प्रलंबित पैसे आणि ग्रॅच्युइटीची लाखो रुपयांची रक्कम अद्याप मिळालेली नसल्याचा त्यांचा आरोप आहे.
या रकमेच्या मागणीसाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली, निवेदने दिली. मनपा प्रशासनाकडून वेळोवेळी आश्वासने मिळाली; मात्र प्रत्यक्षात थकीत रक्कम मिळत नसल्याने त्यांची नाराजी वाढत गेली. अखेर संतापाचा उद्रेक झाल्याने त्यांनी मनपा प्रवेशद्वारासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.

‘इतरांची बिले काढायला पैसे आहेत, मग आमचे हक्काचे पैसे का नाहीत?’
या घटनेनंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मनपा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आयुक्तांकडे इतरांची बिले काढण्यासाठी पैसे उपलब्ध होतात, मग आठ वर्षांपासून प्रलंबित असलेली आमची हक्काची रक्कम देण्यासाठी पैसे का नाहीत, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यात आर्थिक आधार ठरणारी रक्कम मिळवण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मनपा प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून थकीत रक्कम अदा करावी, अशी त्यांची मागणी आहे.
या घटनेमुळे धुळे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित देयकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
