आदिवासी परंपरा जपण्यासाठी वळवी परिवाराची एकजुटीची हाक!
कात्री येथे आज ११ वे महासंमेलन; महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील समाजबांधवांची उपस्थिती, प्रबोधनकार भवरलाल परमार यांचे मार्गदर्शन
धडगाव प्रतिनिधी : आदिवासी समाजाची संस्कृती, अस्मिता आणि आत्मसन्मान जपत पारंपरिक रूढी-परंपरांचे संवर्धन करण्यासाठी आदिवासी वळवी परिवाराच्या वतीने १४ नोव्हेंबर रोजी कात्री (ता. धडगाव) येथे ११ वे महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनासाठी महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांतील वळवी कुळातील समाजबांधव एकत्र येणार आहेत. राजस्थानचे आदिवासी प्रबोधनकार भवरलाल परमार यांची उपस्थिती हे संमेलनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
कुळपरंपरेचे जतन आणि सामाजिक समन्वयावर भर
आदिवासी समाजात एकाच कुळांतर्गत विवाह करणे निषिद्ध मानले जाते. ही परंपरा महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशातील वळवी समाजबांधवांकडून जपली जात आहे. रोटी-बेटीच्या व्यवहारात पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या या आदर्श परंपरेचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, तसेच आदिवासी संस्कृती आणि सामाजिक मूल्यांचे जतन करणे हा महासंमेलनाचा प्रमुख उद्देश आहे.
तीन राज्यांतील बांधवांना एकत्र आणण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये वळवी कुळातील समाजबांधव विखुरलेले आहेत. त्यांच्यात परस्पर संवाद, समन्वय आणि एकजूट निर्माण व्हावी, विविध पारंपरिक प्रथांबाबत जनजागृती व्हावी आणि आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांच्या लढ्याला अधिक बळ मिळावे, या उद्देशाने महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनात आदिवासी समाजाचे राष्ट्रीय प्रबोधनकार भवरलाल परमार (राजस्थान) उपस्थित राहून समाजबांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांकडे आणि मार्गदर्शनाकडे समाजाचे लक्ष लागले आहे.
या महासंमेलनाला तीनही राज्यांतील वळवी कुळातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वळवी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
