चौगाव किल्ल्यावर तीन दिवसीय गडपूजन सोहळा उत्साहात संपन्न!
पाचशेहून अधिक दुर्गसेवकांचा सहभाग; संयुक्त सर्वेक्षणाची तारीख त्वरित जाहीर करण्याची मागणी
चोपडा | प्रतिनिधी – राहुल पाटील
चोपडा : दरवर्षीप्रमाणे यंदाही धनत्रयोदशीपासून सलग तीन दिवस चौगाव किल्ल्यावर गडपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात चोपडा तालुक्यातील शेकडो दुर्गसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ऐतिहासिक वारशाप्रती आपली श्रद्धा आणि संवर्धनाची बांधिलकी व्यक्त केली.
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर गडपूजनाचा प्रारंभ
सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, ६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, चोपडा यांच्या वतीने गडपूजन करण्यात आले. सकाळी सात वाजता चोपडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुर्गसेवक एकत्र आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांनी चौगाव किल्ल्याकडे प्रस्थान केले.
सर्वप्रथम तीर्थक्षेत्र त्रिवेणी महादेव मंदिर येथे पूजन करण्यात आले. त्यानंतर किल्ल्याच्या पूर्वाभिमुख प्रवेशद्वाराला तोरण बांधण्यात आले. परिसराची स्वच्छता करून रांगोळी काढण्यात आली. आई भवानी मंदिरात आरती करून पारंपरिक पद्धतीने गडपूजन करण्यात आले.
पहिल्या दिवशी तीनशेहून अधिक दुर्गसेवकांची उपस्थिती
पहिल्या दिवसाच्या गडपूजन सोहळ्याला तीनशेहून अधिक दुर्गसेवक उपस्थित होते. चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले, चोपडा येथील श्यामभाऊ परदेशी, अनिल वानखेडे, चौगाव येथील पोलीस पाटील गोरख हरचंद पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पत्रकार आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थिती लावली.
सलग तीन दिवस चाललेल्या या उत्सवात तालुक्यातील पाचशेहून अधिक दुर्गसेवकांनी गडपूजन केले. या उपक्रमातून ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
संयुक्त सर्वेक्षण रखडल्याने दुर्गसेवकांमध्ये नाराजी
चौगाव किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळावा, तसेच पर्यटनस्थळाचा ‘ब’ दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून विविध दुर्गसंवर्धन संघटनांकडून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्याप चौगाव किल्ल्याच्या संयुक्त सर्वेक्षणाची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.
संयुक्त सर्वेक्षण रखडल्याने दुर्गसेवकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. किल्ल्याच्या ऐतिहासिक महत्त्वाचा विचार करून संबंधित विभागांनी संयुक्त सर्वेक्षणाची तारीख त्वरित जाहीर करावी, अशी मागणी दुर्गसेवकांकडून करण्यात आली आहे.
गडपूजनाच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा जपण्याचा निर्धार व्यक्त होत असतानाच, चौगाव किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनानेही तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
