बलिप्रतिपदेनिमित्त कुऱ्हे पानाचे येथे शेतकरी एकजुटीचा हुंकार!
पारंपरिक तळी उचलण्याच्या कार्यक्रमातून बळीराजाच्या सन्मानाचा जागर; शेतकरी पाणी हक्क समितीचा पुढाकार, कष्टकरी शेतकऱ्यांचा गौरव
भुसावळ (प्रतिनिधी – संघरत्न सपकाळे) :
‘इडा-पिडा टळो, बळीचे राज्य येवो!’ या मंगल आणि प्रेरणादायी घोषणांनी बलिप्रतिपदेच्या निमित्ताने कुऱ्हे (पानाचे) येथे शेतकरी एकजुटीचा हुंकार घुमला. शेतकरी पाणी हक्क समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पारंपरिक तळी उचलण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यात बळीराजाचा सन्मान, शेतीसाठी पाण्याचा हक्क आणि शेतकरी एकजुटीचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.
शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून समाजाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राजा बळी यांच्या लोककल्याणकारी विचारांचे स्मरण करीत शेतकऱ्यांच्या कष्टांचा सन्मान आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी समाजाने एकत्र उभे राहण्याचे आवाहन या कार्यक्रमातून करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आप्पासाहेब एकनाथराव बडगुजर होते. प्रमुख पाहुणे म्हणून जी. के. दादा पाटील, नथ्यू वराडे दादा, रवींद्र गांधेले, निवृत्ती बावस्कर आणि मधुकर सपकाळे उपस्थित होते.
कष्टकरी शेतकऱ्यांचा सन्मान; श्रमाला सामाजिक प्रतिष्ठा
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे गावातील कष्टकरी शेतकऱ्यांचा रुमाल, टोपी आणि सन्मानपत्र देऊन करण्यात आलेला गौरव. काळ्या आईशी इमान राखत शेतात राबणाऱ्या बळीराजाच्या श्रमाला प्रतिष्ठा देण्याचा हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला भावला.
यावेळी प्रभाकर कुंभार, सुरेश तेली, दिनकर सुतार, नामदेव वराडे, मुरलीधर भाई, प्रीतम पारधे, समाधान आठवले, रमेश बावस्कर, अशोक काळे, मोहन ताडे, गोकुळ कोळी, हिरा परदेशी, राजू बडगुजर, मानसिंग जाधव, यासीन मन्यार, अमोल बिल, दिनेश गांधेले आणि संतोष पारधी या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
शेतकऱ्यांचा सन्मान हा केवळ सत्काराचा कार्यक्रम नसून त्यांच्या कष्टांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि त्यांच्या श्रमाला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याची कृती आहे. राजा बळी यांच्या समता, समृद्धी आणि लोककल्याणाच्या विचारांना अभिवादन करीत शेतकऱ्यांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
तळी उचलण्याच्या परंपरेतून पाणी हक्काचा जागर
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास चौधरी यांनी केले. त्यांनी बलिप्रतिपदेचे महत्त्व विशद करत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला. सुधाकर बडगुजर यांनी तळी उचलण्याची परंपरा आणि शेतीसाठी पाण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
काशिनाथ पाटील, जगण पाटील, संजय वराडे, संदीप महाजन, प्रकाश चौधरी, छगन वराडे, गोकुळ कोळी, प्रकाश उंबरकर आणि विलास चौधरी या मान्यवरांनी तळी उचलून कार्यक्रमाची सुरुवात केली. सूत्रसंचालन प्रमोद उंबरकर यांनी प्रभावीपणे केले, तर अरविंद बावस्कर यांनी आभार मानले.
पाण्याचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न!
कुऱ्हे पानाचे परिसरातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे बलिप्रतिपदेचा हा सोहळा केवळ धार्मिक किंवा पारंपरिक कार्यक्रम न राहता शेतकरी हक्क, पाणी आणि एकजुटीच्या चळवळीला बळ देणारा ठरला.
शेतकऱ्यांच्या घामाला प्रतिष्ठा, शेतीला सिंचनाचे पाणी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय खऱ्या अर्थाने बळीराजाचे राज्य येणार नाही, असा सामूहिक विचार यावेळी अधोरेखित करण्यात आला.
कार्यक्रमाला रवींद्र बोबडे, मधुकर पाटील, प्रवीण नागपुरे, शशिकांत वराडे, आण्णा गुरुजी, चंद्रकांत बावस्कर, विलास रंदाळे, एन. डी. पाटील, रमेश जाधव, कसदास जाधव, श्रीकांत बरकले, संजू शिंदे, गोपाल अस्वार, श्रीदत्त गुरु भजनी मंडळ, विनोद कोळी, राकेश बारी, एकनाथ पाटील, रमेश कोळी आणि बापू पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
‘इडा-पिडा टळो, बळीचे राज्य येवो!’, ‘पाणी आमच्या हक्काचे!’ आणि ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो!’ अशा घोषणांतून कार्यक्रमाचा समारोप झाला. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान, शिवारात हिरवाई आणि प्रत्येक शेतापर्यंत सिंचनाचे पाणी पोहोचावे, हीच राजा बळींच्या चरणी प्रार्थना व्यक्त करण्यात आली.
