समान काम, समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर!
धुळे जिल्ह्यातील ४५५ कर्मचाऱ्यांचा सहभाग; जिल्हा वकील संघाचा आंदोलनाला पाठिंबा, शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
धुळे (प्रतिनिधी) : ‘समान काम, समान वेतन’ या प्रमुख मागणीसाठी धुळे जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. शासनाकडे प्रस्ताव सादर करूनही वर्षभरापासून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. मागण्या मान्य केल्याचा शासन निर्णय (जीआर) जारी होत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील तब्बल ४५५ न्यायालयीन कर्मचारी या संपात सहभागी झाले असून, जिल्हा वकील संघानेही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
उच्च न्यायालयाच्या धर्तीवर जिल्हा न्यायालयांमधील कर्मचाऱ्यांनाही समान कामाच्या बदल्यात समान वेतन मिळावे, अशी न्यायालयीन कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. यासंदर्भात शासनाला प्रस्ताव सादर करून जवळपास वर्षभराचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.
शासनाच्या भूमिकेवर कर्मचाऱ्यांचा संताप
न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन नेमके दुर्लक्ष का करत आहे, असा उद्विग्न सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. प्रस्ताव सादर करूनही निर्णय होत नसल्याने कर्मचाऱ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने तातडीने मागण्या मान्य करून त्याबाबतचा जीआर काढावा; अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
संपादरम्यान कर्मचाऱ्यांनी विविध घोषणांद्वारे आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या घोषणांनी न्यायालयाचा परिसर दुमदुमून गेला. या आंदोलनाला जिल्हा वकील संघाने पाठिंबा दिल्याने कर्मचाऱ्यांच्या मागणीला वकील वर्गाकडूनही समर्थन मिळाले आहे.
४५५ कर्मचाऱ्यांचा सहभाग
या आंदोलनात लघुलेखक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, उपाध्यक्ष नीलिमा भालेराव, निलेश इंगळे, सुनील जिरे, मनोज मीठ सागर, मनोज अहिरराव, सचिन सोनवणे, प्रवीण बागुल, सूर्यकांत डोमादे, संजय माळी, अंजुम शेख, पंकज पुणेकर, कपिल चांदणे, तुषार गुरव, पुष्पक ठाणगे, प्रशांत पाटील, सचिन ताडगे, मिलिंद माळी, हेमंत माळी, नितीन बर्डे, नकुल पाटील, समीर शेख, संगीता बाविस्कर, वर्षा बोरकर, गायत्री पवार, करुणा पवार, जयश्री वाघ, सीमा पाटील, पूनम परदेशी, दीपाली मीठ सागर, माधुरी भदाणे, ज्योती सूर्यवंशी, मोहिनी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले आहेत.
शासनाने या मागण्यांवर लवकर निर्णय घेऊन न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप मिटवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता शासन या आंदोलनाची कितपत दखल घेते आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
