बियाणी यांच्या जमीनधारणेची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासकीय चौकशी सुरू!
जमीन कमाल मर्यादा कायद्याच्या कलम १४ व १६ अन्वये तपास; आठ दिवसांत जमीन मालकीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश
भुसावळ | संघरत्न सपकाळे
महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ अंतर्गत कलम १४ व १६ अन्वये बियाणी यांच्या जमीनधारणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथील कुळकायदा शाखेकडून शासकीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधित जमीनधारकांकडून जमीन मालकी व धारणेचे सविस्तर विवरण मागविण्यात आले असून, आवश्यक कागदपत्रे आठ दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या अर्जानंतर प्रशासनाची हालचाल
या प्रकरणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी ५ एप्रिल २०२३ आणि १ एप्रिल २०२४ रोजी अर्ज सादर करून संबंधित जमीनधारणेच्या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
अपर जिल्हाधिकारी, जळगाव यांनी ११ ऑगस्ट २०२६ रोजी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकारी, जळगाव यांनी २ ऑक्टोबर २०२६ रोजी आदेश पारित केला. या आदेशानुसार महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ मधील कलम १४ व १६ अन्वये शासकीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

जमीन मालकीचे विवरण व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश
श्रीमती कांताबाई बंसीलाल बियाणी यांना त्यांच्या तसेच कुटुंबातील सदस्यांच्या मालकीच्या व धारण केलेल्या जमिनींचे सविस्तर विवरण आणि आवश्यक कागदपत्रे आठ दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश तहसीलदार विजय सूर्यवंशी (कुळकायदा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव) यांनी दिले आहेत.
याशिवाय तहसीलदार, भुसावळ यांनाही संबंधित जमिनींचे सातबारा उतारे, महसूल नोंदी, आवश्यक कागदपत्रे आणि मूळ संचिका आठ दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणात जमीनधारणेच्या नोंदी, मालकी हक्क आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.
निष्पक्ष चौकशी करून कायद्यानुसार कारवाईची मागणी
सदर प्रकरणाची चौकशी पारदर्शक, निष्पक्ष आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार करण्यात यावी. जमीनधारणेच्या कमाल मर्यादेबाबत कायद्याची काटेकोर तपासणी करून चौकशीत काही अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी केली आहे.
शासनाच्या जमीनविषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि जमीनधारणेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्याची योग्य तपासणी व्हावी, यासाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे.
