भारतीय संविधानाने सामान्य माणसाला जागतिक दर्जा प्राप्त करून दिला!
संविधानाची ताकद म्हणजे लोकशाहीची गतिमानता, शिक्षणाचा विस्तार आणि सर्वसामान्यांच्या प्रगतीची संधी – मुकुंद सपकाळे
जळगाव (प्रतिनिधी) : भारतीय संविधान हे केवळ देशाच्या राज्यकारभाराचे मार्गदर्शक दस्तऐवज नसून प्रत्येक भारतीय नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारे सामर्थ्यशाली साधन आहे. भारतीय लोकशाहीची गतिमानता, देशाचा विकास, प्रगती, शिक्षणाचे वाढलेले प्रमाण आणि सामान्य माणसाला जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी भारतीय संविधानाने उपलब्ध करून दिली आहे. हीच भारतीय संविधानाची खरी यशस्विता आहे, असे प्रतिपादन मुकुंद सपकाळे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संविधानाच्या मूल्यांचे स्मरण करून भारतीय लोकशाही आणि संविधानाच्या महत्त्वावर विचार मांडण्यात आले.
भारतीय संविधानामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळाले. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग संविधानाने खुला केला. शिक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक समता आणि लोकशाहीतील सहभाग यामुळे सामान्य कुटुंबातील व्यक्तीलाही प्रगतीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. समाजातील वंचित, दुर्बल आणि उपेक्षित घटकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देण्याचे ऐतिहासिक कार्य संविधानाने केले आहे, असेही मुकुंद सपकाळे यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुकुंद सपकाळे, डॉ. मिलिंद बागुल, मुकुंदराव सपकाळे, अमोल कोल्हे आणि बाबुलाल सोनवणे यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हरिश्चंद्र सोनवणे यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.
प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी संविधान दिनाचे महत्त्व, संविधानाची मूलभूत तत्त्वे आणि भारतीय लोकशाहीच्या जडणघडणीतील संविधानाचे योगदान याविषयी आपली भूमिका मांडली. संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये केवळ पुस्तकापुरती मर्यादित न राहता प्रत्येक नागरिकाच्या आचरणात उतरली पाहिजेत, असा विचार यावेळी व्यक्त करण्यात आला.
भारतीय संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिले आहेत; मात्र त्या अधिकारांसोबत नागरिक म्हणून कर्तव्यांची जाणीव ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. संविधानाचे संरक्षण करणे, लोकशाही मूल्यांचा आदर करणे आणि सामाजिक सलोखा टिकवणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाला सुनील सोनवणे, गोपाल भालेराव, जयपाल धुरंदर, गोकुळ पोहेकर, श्रीकांत बाविस्कर, अमोल कोल्हे, वसंत सपकाळे, डॉ. प्रकाश वानखेडे, शैलेश सोनवणे, आनंद कोचुरे, सुभाष सपकाळे, संतोष गायकवाड, जगदीश सपकाळे, प्रशांत बाबुलाल सोनवणे, प्रीती वले, रवींद्र बाविस्कर, बाबुलाल विठ्ठल सोनवणे, कैलास उमाळे, रवींद्र भालेराव, मुकुंदराव सपकाळे, ज्योती बोरसे, विनोद बोरसे, शारदा इंगळे, प्रमिला इंगळे, ज्योती वंदना वानखेडे, शोभा इंगळे, उषाबाई इंगळे, शारदा तायडे, प्रमिला पगारे, विद्या झनके, नारायण सपकाळे आणि सुहास बागुल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिलिंद बागुल यांनी केले, तर आभार बापू पानपाटील यांनी मानले. संविधानाच्या गौरवाबरोबरच त्यातील मूल्ये समाजजीवनात रुजविण्याचा संकल्प या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला.
