भुसावळमध्ये दिपाली हिवाळे आणि सुनील हिवाळे यांचा बालविवाहमुक्तीचा पुढाकार!
जागतिक बालविवाह प्रतिबंध दिनानिमित्त तालुकाभर जनजागृती; आमदारांसह लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि शैक्षणिक संस्थांनी घेतली बालविवाह रोखण्याची शपथ
प्रमोद पाटील | प्रतिनिधी, भुसावळ
भुसावळ : जागतिक बालविवाह प्रतिबंध दिनानिमित्त २७ नोव्हेंबर रोजी भुसावळ तालुक्यात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. दिपाली सुनील हिवाळे आणि सुनील जगन हिवाळे यांनी पुढाकार घेत लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि विविध विभागांतील प्रमुखांच्या विशेष मुलाखतींच्या माध्यमातून बालविवाहविरोधी जनजागृती केली. तालुक्यातील महाविद्यालये तसेच शासकीय, महसूल, पोलीस, आरोग्य, शिक्षण आणि प्रशासकीय विभागांमध्ये बालविवाहमुक्तीची शपथ घेण्यात आली. या उपक्रमाला विविध स्तरांतून प्रतिसाद मिळाला.
२७ नोव्हेंबर हा दिवस यावर्षीपासून जागतिक बालविवाह प्रतिबंध दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. बालविवाह ही गंभीर सामाजिक कुप्रथा असून ती मुळापासून नष्ट करण्यासाठी जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर विविध समित्या कार्यरत आहेत. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असताना विवाह करणे कायद्याने प्रतिबंधित आहे. ग्रामीण भागात ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका, तर शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ) यांच्यावर बालविवाह रोखण्याच्या दृष्टीने महत्त्वाची जबाबदारी आहे.
दिपाली हिवाळे आणि सुनील हिवाळे यांचा विशेष पुढाकार
या जनजागृती अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे दिपाली सुनील हिवाळे आणि सुनील जगन हिवाळे यांनी स्वतः पुढाकार घेऊन तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि विविध शासकीय यंत्रणांतील प्रमुख अधिकाऱ्यांच्या विशेष मुलाखती घेतल्या. बालविवाहाचे दुष्परिणाम, कायदेशीर तरतुदी, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नागरिकांची भूमिका याबाबत त्यांनी मान्यवरांशी संवाद साधला. या माध्यमातून बालविवाहमुक्त समाजनिर्मितीचा संदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या अभियानात सहभागी झालेल्या मान्यवरांमध्ये भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे, प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जी. जी. जाधव, भुसावळ नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी जनार्दन पवार, नायब तहसीलदार प्रीती लुटे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोडे, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या भुसावळ प्रकल्प अधिकारी संध्या रोजतकर, बाल संरक्षण अधिकारी महेंद्र आत्माराम पाखरे, नगरपालिका दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तौसिफ खान आणि पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी गौतम वाडे यांचा समावेश होता.
याशिवाय तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या आणि पोलीस पाटील यांनीही या अभियानाला मोलाचे सहकार्य केले.
बालविवाह रोखणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य
कमी वयात विवाह झाल्याने मुला-मुलींच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि संपूर्ण आयुष्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी बालविवाह रोखणे ही प्रत्येक सुजाण नागरिकाची जबाबदारी आहे. आपल्या परिसरात कुठेही बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तातडीने १०९८ या चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाते, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
तसेच बाजारपेठ पोलीस ठाणे किंवा नजीकचे पोलीस ठाणे, प्रांत व तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविका अथवा नगरपरिषद प्रशासनाशी संपर्क साधून बालविवाह रोखण्यासाठी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी केले.
दिपाली सुनील हिवाळे आणि सुनील जगन हिवाळे यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि शैक्षणिक क्षेत्राला एका सामाजिक विषयावर एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला. बालविवाहमुक्त भुसावळ आणि बालकांचे सुरक्षित भविष्य हा या जनजागृती अभियानाचा मुख्य संदेश ठरला.
