टिटवाळा : “आजच्या काळात वृत्तपत्र चालवणे हे ध्येयवेड्या माणसाचे काम आहे. मुकुंद नन्नवरे हा संघर्षातून उभा राहिलेला माझा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मी माझा हा मुकुंद आता टिटवाळा आणि मुंबईकरांच्या हवाली केला आहे, त्याला आपले मानून खंबीर साथ द्या,” असे भावनिक आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. निमित्त होते, टिटवाळा येथे पार पडलेल्या दैनिक ‘जन सम्राट टाईम्स’ च्या दिमाखदार प्रकाशन सोहळ्याचे.
रविवार, ५ एप्रिल रोजी टिटवाळा येथील सिद्धेश्वर हाईट्स मैदानावर हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी ना. पाटील यांच्या हस्ते ‘जन सम्राट टाईम्स’च्या कार्यालयाचे उद्घाटन, वेबसाईटचे अनावरण आणि वृत्तपत्राचे अधिकृत प्रकाशन करण्यात आले.

बातम्यांची खातरजमा करणारी यंत्रणा हवी!
प्रकाशन सोहळ्यानंतर आयोजित जाहीर सभेत ना. गुलाबराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या सद्यस्थितीवर परखड भाष्य केले. ते म्हणाले की, “वृत्तपत्रांनी समाज घडविण्याचे काम करावे. सध्या बातम्या ट्विस्ट करून किंवा स्वतःच्या पदरचे घालून देण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे जनमानसात चुकीचा संदेश जातो. प्रत्येक वृत्तपत्र कार्यालयात बातमीची सत्यता पडताळणारी (फॅक्ट-चेक) स्वतंत्र यंत्रणा असायला हवी. वस्तुस्थिती मांडणारी पत्रकारिताच टिकते.”
४०० किमीचा प्रवास आणि १२ वर्षांचे नाते
मंत्री महोदयांनी यावेळी आपल्या आणि संपादक मुकुंद नन्नवरे यांच्यातील १२ वर्षांच्या स्नेहबंधांना उजाळा दिला. “निवडणूक काळात व्यस्त असूनही केवळ मुकुंदच्या आग्रहाखातर मी ४०० किलोमीटरचा प्रवास करून येथे आलो आहे. तो ध्येयवेडा आहे, मी त्याला पेपर काढू नको म्हणून खूप समजावले, पण त्याने ऐकले नाही. आता तो या प्रवासात उतरलाच आहे, तर एक ‘भाऊ’ म्हणून मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,” अशा शब्दांत त्यांनी पाठबळ दिले.

सामाजिक चळवळींना व्यासपीठ देण्याचा निर्धार
संपादक मुकुंदराव नंन्नवरे यांनी आपल्या प्रास्ताविकात वृत्तपत्राची भूमिका मांडली. “गेल्या ३० वर्षांच्या सामाजिक चळवळीत आणि २० वर्षांच्या पत्रकारितेत मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, सर्वसामान्यांच्या आणि चळवळीच्या बातम्यांना मुख्य प्रवाहात जागा मिळत नाही. हीच पोकळी भरून काढण्यासाठी ‘जन सम्राट टाईम्स’चे रणशिंग फुंकले आहे,” असे त्यांनी सांगितले.

सोहळ्याची वैशिष्ट्ये:
* मान्यवरांची मांदियाळी: ज्येष्ठ नेते तानसेनभाई नन्नवरे, आरपीआयचे अण्णासाहेब रोकडे, राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी, समाजभूषण राजू झनके यांच्यासह अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
* राजकीय टोलेबाजी: “आता कोणता नेता कधी कोणत्या पक्षात असेल याचा नेम उरलेला नाही,” अशी टिप्पणी करत ना. पाटील यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मिश्किल भाष्य केले. तसेच “आम्ही ‘मार्मिक’ वाचून घडलो,” असे सांगत जुन्या काळच्या पत्रकारितेच्या आठवणींना उजाळा दिला.
* महामानवांना अभिवादन: सोहळ्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश सपकाळे यांनी केले, तर सोहळा यशस्वी करण्यासाठी धीरज सोनवणे, गोविंद नन्नवरे यांच्यासह ‘जन सम्राट’च्या टीमने विशेष परिश्रम घेतले. पुढील वर्षाचा वर्धापन दिन कल्याणच्या बंदिस्त सभागृहात भव्य स्वरूपात साजरा करण्याचा संकल्पही यावेळी सोडण्यात आला.
