पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदावर नियुक्ती व्हावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांकडून आता अनोख्या आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालय व ‘वर्षा’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन ‘घंटा भेट’ देत आपल्या भावना व्यक्त करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
शहरातील जुन्या कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक पदावर संधी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात येणार आहे. अनेक वर्षे पक्ष संघटनेसाठी काम करूनही योग्य संधी मिळत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली आहे.
कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील विविध नागरी समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने मोर्चे, आंदोलने केली. या आंदोलनांमुळे अनेक वेळा त्यांच्यावर पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हेही दाखल झाले. तरीही पक्षाकडून त्यांना अपेक्षित सन्मान मिळालेला नाही, अशी खंत व्यक्त होत आहे.
विशेषतः प्रभाग क्रमांक 13 मध्ये 2017 साली भाजपचे दोन नगरसेवक निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठे प्रयत्न केले होते. आगामी निवडणुकीत तीन नगरसेवक निवडून आणण्यासाठीही त्यांनी जोरदार तयारी केली. मात्र, त्यानंतरही स्वीकृत नगरसेवक पदासाठी त्यांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
कार्यकर्त्यांनी असा आरोपही केला आहे की, इतर पक्षांमध्ये — विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गटात — नवीन कार्यकर्त्यांना निवडणुकीत तिकीट देण्यात येत आहे, तर जुन्या कार्यकर्त्यांना संघटनात्मक कामासाठीच थांबवले जात आहे.
याशिवाय शहरातील काही प्रमुख नेते — शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, अमित गोरखे — हे जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर 13 एप्रिल 2026 रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन ‘घंटा भेट’ देण्यात येणार असून, कार्यकर्त्यांच्या भावना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
भाजप कार्यकर्ता सचिन काळभोर यांनी सांगितले की, “आम्ही अनेक वर्षे पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. शहरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र झटत आहोत. मात्र, आम्हाला न्याय मिळत नाही. त्यामुळेच आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटून आमच्या भावना व्यक्त करणार आहोत.”
या आंदोलनामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, मुख्यमंत्री या मागण्यांवर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
