५० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग; सामाजिक बांधिलकीचा संदेश
पाळधी (ता. धरणगाव) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पाळधी येथे सावता माळी मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत तब्बल ५० जणांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि उद्योजक दिलीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी फुले यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले.
रक्तदान शिबिरात माजी सरपंच चंदू पाटील यांच्यासह एकूण ४९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या प्रसंगी धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील, माजी सरपंच हेमंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर पाटील, राजू पाटील, राजू महाजन, राहुल अर्जुन पाटील, पप्पू माळी यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रक्तदान शिबिरातून समाजात परस्पर सहकार्य, मानवता आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित झाले. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
