मुख्यमंत्र्यांना भेटून आंदोलनाचा इरादा; कायदेशीर मार्गाने मागणी करा, निगडी पोलिसांचे आवाहन
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील राजकीय घडामोडींना वेग आला असून, स्वीकृत नगरसेवक पदाच्या नियुक्तीवरून निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ‘घंटा भेट’ आंदोलनाच्या इशाऱ्यावर निगडी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. बी.एन.एस.एस. कलम १६८ अंतर्गत श्री. सचिन सुदाम काळभोर यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षातील काही कार्यकर्त्यांमध्ये स्वीकृत नगरसेवक पदावर नियुक्ती न झाल्यामुळे नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक १३ मध्ये २०१७ पासून पक्षवाढीसाठी कार्यरत असलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर सचिन काळभोर यांनी १३ एप्रिल रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जुन्या कार्यकर्त्यांच्या भावना मांडण्याचा तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी थेट निवडीची मागणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. यासंदर्भातील ‘घंटा भेट’ आंदोलनाची बातमी स्थानिक माध्यमांत प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ दखल घेतली.
निगडी पोलिसांनी बजावलेल्या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, संबंधितांनी अशा प्रकारचे आंदोलन टाळावे व मागण्या मांडण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. अन्यथा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या या नोटीसमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, आगामी काळात या प्रकरणात कोणती भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
