साळवे यांची नियंत्रण कक्षात बदली; गायकवाड वाहतूक शाखेत, वादग्रस्त घटनांची पार्श्वभूमी
जळगाव : जळगाव शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक पवन देसले यांची चोपडा शहर पोलिस स्टेशन येथे बदली करण्यात आली असून त्यांनी प्रभारी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातील संजय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, चोपडा येथील काही वादग्रस्त घटनांच्या पार्श्वभूमीवर ही बदली झाल्याची चर्चा रंगली आहे.
माजी पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांची चोपडा शहर येथून नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. चोपडा शहरात गोरक्षक आणि गोतस्कर यांच्यात झालेल्या वादानंतर साळवे यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढत त्यांच्या निलंबनाची मागणीही केली होती. दरम्यान, पवन देसले यांनी चोपडा शहर पोलिस स्टेशनचा कार्यभार स्वीकारला असला, तरी संजय गायकवाड यांनी अद्याप वाहतूक शाखेचा पदभार स्वीकारलेला नाही. ते लवकरच जबाबदारी स्वीकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
