“सामान्य नागरिकांची फरफट कधी थांबणार?”; धुळे मनपाच्या कामकाजावर जितेंद्र शिरसाठ यांचा संतप्त सवाल
धुळे (सुनील निकम) : मालमत्ता कर विभागातील रखडलेल्या कामांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतानाच धुळे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. कार्यकर्त्याचे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेले मालमत्तेचे काम मार्गी लावण्यासाठी गेलेल्या माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांना दुपारच्या वेळेत कार्यालयात एकही कर्मचारी आढळून न आल्याने त्यांनी संताप व्यक्त करत थेट मालमत्ता कर अधीक्षकांनाच धारेवर धरले.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांच्या एका कार्यकर्त्याने नवीन घर खरेदी केल्यानंतर घरपट्टी नावावर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह प्रतिज्ञापत्र मालमत्ता कर विभागात सादर केले होते. मात्र अनेक महिने उलटूनही काम पूर्ण होत नसल्याने संबंधित कार्यकर्त्याची वारंवार फरफट सुरू होती. अखेर नागरिकांच्या या त्रासाला कंटाळून माजी नगरसेवक स्वतः विभागात पोहोचले.
परंतु दुपारच्या सुमारास मालमत्ता कर विभागात गेल्यानंतर कार्यालयातील बहुतांश कर्मचारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. ऐन कामकाजाच्या वेळेत कर्मचारी गायब असल्याने संतप्त झालेल्या जितेंद्र शिरसाठ यांनी मनपा प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली. “सामान्य नागरिकांनी किती वेळा चकरा मारायच्या? अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात नसतील तर नागरिकांची कामे कशी होणार?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी मालमत्ता कर अधीक्षकांना थेट जाब विचारत विभागातील कामकाजात तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली. नागरिकांच्या समस्या सोडवण्याऐवजी त्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, शासनाच्या नियमानुसार शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत जेवणासाठी घरी जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश असतानाही अनेक कर्मचारी दुपारी एक वाजल्यापासून सायंकाळी साडेचारपर्यंत कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांची कामे रखडत असून मनपा प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. माजी नगरसेवकांच्या या आक्रमक भूमिकेनंतर तरी मालमत्ता कर विभागातील कामकाजात सुधारणा होणार का, की नागरिकांची फरफट अशीच सुरू राहणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
