विदर्भ आणि मराठवाड्यात इंधनाची टंचाई असून पेट्रोलपंपांवर शेतकऱ्यांच्या रांगा
इंधनाच्या कृत्रिम टंचाईवरुन मुख्यमंत्र्यांचा इशारा, गृह विभागाला आदेश
मुंबई : राज्यात पेट्रोलबाबत सरासरी मागणीपेक्षा २३ टक्क्यांनी मागणी वाढली आहे. डिझेलच्या मागणीत तर तब्बल ५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अकोला येथे तर १५४ टक्क्यांपेक्षा जास्त पुरवठा होत आहे. तरीही टंचाईसदृश स्थिती तयार होत आहे. त्यामुळे इंधनाची साठेबाजी होत असल्याचा दाट संशय असून साठेबाजांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पुरवठा तसेच गृह विभागाला दिले आहेत’, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.
विदर्भ आणि मराठवाड्यात इंधनाची टंचाई असून पेट्रोलपंपांवर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचे चित्र सातत्याने पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी इंधनाची कृत्रिम टंचाई खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगतानाच साठेबाजांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. ‘सरासरीपेक्षा पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढली आहे. मात्र, या मागणीची पूर्तता केली जात आहे.
पेट्रोलच्या मागणीत २३ टक्क्यांनी तर डिझेलच्या मागणीत ५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अकोल्यात १५४ टक्क्यांहून जास्त पुरवठा होत आहे. शेतकऱ्यांना डिझेल मिळावे यासाठी प्रयत्न करत आहोत. त्याचा गैरफायदा काही लोक घेत आहेत. व्यावसायिक वापराच्या इंधनाची मागणी कमी होताना दिसत आहे. सर्वसाधारण मागणीचे इंधन व्यावसायिक वापराकडे वळविण्यात येत आहे का, याची चौकशी करत आहोत’, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विरोधकांना टोला
कांद्याच्या दरावरून काही लोक विनाकारण राजकारण करत असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. ‘कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळयात अश्रू येणार नाहीत. अशी मंडळी आता अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करत आहेत. पण महायुतीचे सरकार कांद्याबाबत संवेदनशीलतेने काम करत आहे. विरोधकांची केवळ ‘फोटो अपॉच्र्युनिटी’ सुरू आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले. प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेबाबत विचारले असता, ‘प्रणिती शिंदे या पहिल्यांदाच खासदार झाल्या आहेत. त्यांनी अधिक जबाबदारीने बोलले पाहिजे आपण कोणाबद्द बोलत आहोत, काय बोलत आहोत, याचे भान राहत नसेल तर अशा लोकांना जनताच त्यांचे स्थान दाखवेल’, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कांदाप्रश्नी सरकार संवेदनशील
कांद्याच्या दराबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारने कांद्याच्या खरेदीचा भाव साडेतीन रुपयांनी वाढवून १५ रुपये केल्याचे सांगितले. दरनिश्चितीबाबत केंद्र सरकारला विनंती केली असून बुधवारी केंद्र सरकारसोबत बैठक होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांबाबत राज्य सरकार संवेदनशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
जळगावात इंधनाचा तुटवडा नाही, तर साठेबाजी!
गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात निर्माण झालेली इंधनाची टंचाई ही वास्तविक नसून ती अफवा आणि मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या साठेबाजीमुळे निर्माण झाल्याचे आता उघड झाले आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत डिझेल आणि पेट्रोलच्या विक्रीत अभूतपूर्व वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्ह्यातील साठेबाजांवर आता पोलीस आणि पुरवठा विभाग संयुक्तपणे कडक कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली आहे. २३ मे रोजी संपलेल्या कालावधीच्या आकडेवारीनुसार, जळगाव जिल्ह्यात नियमित साठ्यापेक्षा तब्बल ८५ टक्के अतिरिक्त डिझेल विकले गेले आहे. तर दुसरीकडे, पेट्रोलच्या मागणीतही मोठी वाढ झाली असून, जळगावात सरासरीपेक्षा ४० ते ५३ टक्क्यांपर्यंत अधिक पेट्रोलची विक्री झाली आहे. इंधनाच्या या कृत्रिम टंचाईमुळे जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दोन दिवसांपर्यंत कायम होते.
प्रतिक्रिया –
पेट्रोल, डिझेलच्या मागणीत नेहमीपेक्षा वाढ झाली आहे. मात्र, या मागणीची पूर्तता केली जात आहे. कुठेही इंधनाची टंचाई नाही. इंधनाची साठेबाजी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
