मध्यरात्रीची घटना; चालक डंपरसह फरार, भुसावळ तालुका पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
भुसावळ (संघरत्न सपकाळे) : तालुक्यातील सुनसगाव शिवारात मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघातात रेतीने भरलेल्या डंपरखाली चिरडून ३८ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुदर्शन पेपर मिलसमोर मोकळ्या जागेत झोपलेल्या मजुराच्या अंगावर डंपरचे चाक गेल्याने हा अपघात झाला. घटनेनंतर चालकाने मदत करण्याऐवजी डंपरसह घटनास्थळावरून पलायन केल्याने संताप व्यक्त होत आहे.
मृत कामगाराची ओळख राजा भैया नथू (वय ३८, रा. धरदुवा, उत्तर प्रदेश) अशी झाली आहे. ते सध्या सुदर्शन पेपर मिल परिसरात वास्तव्यास असून मजुरीचे काम करीत होते. दररोजप्रमाणे काम आटोपल्यानंतर ते कंपनीसमोरील मोकळ्या जागेत झोपले होते.
रिव्हर्स घेताना घडला भीषण अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, ४ जूनच्या मध्यरात्री सुमारे २.५० वाजेच्या सुमारास एमएच-१९-झेड-८३८८ क्रमांकाचा रेतीने भरलेला डंपर रिव्हर्स घेत असताना चालकाचे खाली झोपलेल्या मजुराकडे लक्ष गेले नाही. परिणामी डंपरचे चाक राजा भैया नथू यांच्या अंगावरून गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची जाणीव होऊनही चालकाने जखमी कामगाराला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा किंवा पोलिसांना माहिती देण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. उलट डंपरसह घटनास्थळावरून फरार होत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल धीरज जनार्दन मंडलिक यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून फरार चालकाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.
सीसीटीव्हीच्या आधारे तपासाला गती
दरम्यान, ऑनलाईन CCTNS प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे गुन्हा नोंदविण्यास काहीसा विलंब झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी चालकाचा शोध वेगाने सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मजूर वसाहतींमध्ये भीतीचे वातावरण
या दुर्घटनेमुळे परिसरातील मजूर वसाहतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी अवजड वाहनांची बेफिकीर वाहतूक आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मृत कामगाराच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आरोपी चालकाला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या घटनेमुळे सुनसगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
