अपुऱ्या वीजपुरवठ्याविरोधात संताप; मदत कक्ष सुरू करण्याची मागणी, वीजबिलांचे तोरण लावून अनोखे आंदोलन
शिरपूर (सुनील निकम) : अवाजवी वीजबिले, अपुरा वीजपुरवठा आणि महावितरणच्या कथित गलथान कारभाराविरोधात शिरपूर फर्स्टच्या वतीने आज शिरपूर येथील महावितरण (एमएसईबी) कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शहरातील नागरिक, व्यापारी आणि तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
गेल्या काही दिवसांपासून शिरपूर शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना प्रत्यक्ष वापराच्या तुलनेत अवाजवी वीजबिले येत असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. अनेक ग्राहकांना अत्यल्प वापर असूनही हजारो रुपयांची बिले आकारण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यामुळे सर्वसामान्य ग्राहक आर्थिक अडचणीत सापडत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
दुसरीकडे, शेतकऱ्यांना शेतीपंपांसाठी नियमानुसार किमान आठ तास वीजपुरवठा मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी वेळ वीज उपलब्ध होत असल्याचा आरोप करण्यात आला. अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे सिंचनावर परिणाम होत असून शेतीची कामे खोळंबत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.
या सर्व प्रश्नांकडे महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिरपूर फर्स्टच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान महावितरण कार्यालयात नागरिकांच्या वीजबिल आणि वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी स्वतंत्र ‘हेल्प डेस्क’ सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनाचे विशेष आकर्षण म्हणजे नागरिकांना आलेल्या वीजबिलांचे तोरण तयार करून ते महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले. या अनोख्या पद्धतीने आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवत ग्राहकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
यावेळी शहरातील नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच तालुक्यातील विविध भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अवाजवी वीजबिलांचा प्रश्न आणि अपुऱ्या वीजपुरवठ्याची समस्या तातडीने सोडवावी, अन्यथा आगामी काळात आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे. या आंदोलनामुळे शिरपूर तालुक्यातील वीजपुरवठा आणि बिलिंग व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, महावितरण प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
