हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; भाविकांसाठी लंगर, आकर्षक रोषणाई आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
पुणे (शंकर जोग) : कॅम्प परिसरातील बॉम्बे गॅरेजजवळ असलेल्या हजरत शमशुद्दीनशाह बाबा रहे दर्ग्याचा उर्स शरीफ विविध धार्मिक कार्यक्रम आणि भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. उर्सनिमित्त दर्गा परिसरात मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावत दर्शन घेतले. विशेष म्हणजे, या सोहळ्यात हिंदू-मुस्लिमसह सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी सहभागी होत सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे दर्शन घडवले.
गेल्या २२ वर्षांपासून उर्स कमिटीचे अध्यक्ष दिनेश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक उत्सव सातत्याने आयोजित केला जात असून, परिसरातील नागरिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. यंदाही विविध धार्मिक विधी, प्रार्थना आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उर्स सोहळा भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.
उत्सवानिमित्त दर्गा परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीने उजळून निघाला होता. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्ग्यात हजेरी लावली.
उपस्थित नागरिक आणि भाविकांसाठी विशेष लंगर (महाप्रसाद) आयोजित करण्यात आला होता. हजारो भाविकांनी लंगराचा लाभ घेत धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचा संदेश अनुभवला.
या प्रसंगी उर्स कमिटीचे उपाध्यक्ष दिनेश अर्दाळकर, विजय सोनवणे, अल्फात सय्यद, महेश गुंडाली, उमेश परदेशी, दीपक म्हस्के, रोहन गवांडे, रीना अडागळे, समीर सय्यद यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उर्स सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी उर्स कमिटीच्या पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. धार्मिक परंपरा जपत समाजात एकात्मता, बंधुभाव आणि सौहार्दाचा संदेश देणारा हा सोहळा परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
