मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार; जुन्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची सचिन काळभोर यांची मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यकारिणीत जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना स्थान दिले जात नसल्याचा गंभीर आरोप भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार दाखल करून पक्षासाठी दीर्घकाळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
काळभोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मे २०२५ रोजी शत्रुघ्न काटे यांची पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर शहर कार्यकारिणीच्या रचनेत जुन्या कार्यकर्त्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. गेल्या एक वर्ष २९ दिवसांपासून अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना शहर कार्यकारिणीत स्थान देण्यात आले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
त्यांच्या आरोपानुसार, नागरी समस्या सोडवण्यासाठी मोर्चे, आंदोलने आणि विविध लोकहिताच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या काही कार्यकर्त्यांना तसेच माजी नगरसेवकांना महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत.
‘आमदार समर्थकांनाच प्राधान्य’ असल्याचा आरोप
सचिन काळभोर यांनी असा आरोप केला आहे की, शहर कार्यकारिणीच्या नियुक्त्यांमध्ये केवळ काही आमदार समर्थक कार्यकर्त्यांनाच प्राधान्य दिले जात असून निष्ठावंत व जुन्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवले जात आहे. तसेच, नियुक्ती प्रक्रियेत काही लोकप्रतिनिधी दबावतंत्राचा वापर करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यावर स्वतंत्रपणे निर्णय घेण्याऐवजी दबावाखाली काम करावे लागत असल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली असून त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप काळभोर यांनी केला आहे.
‘सबका साथ, सबका विकास’च्या तत्त्वाशी विसंगत निर्णय?
काळभोर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्ष हा “सबका साथ, सबका विकास” या विचारसरणीवर चालणारा पक्ष असून तळागाळातील कार्यकर्त्यांच्या योगदानावर पक्षाची ताकद उभी आहे. त्यामुळे शहर कार्यकारिणीच्या नियुक्त्यांमध्ये सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना समान संधी मिळणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी हस्तक्षेप करण्याची मागणी
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पिंपरी-चिंचवड शहर भाजप कार्यकारिणीत जुन्या कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल, यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे. दरम्यान, शहर कार्यकारिणीच्या नियुक्त्यांबाबत करण्यात आलेल्या या आरोपांवर संबंधित पक्षपदाधिकारी किंवा अन्य संबंधितांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
