सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे काही तासांत चार संशयित गजाआड; घटनास्थळी धिंड काढत पोलिसांनी दाखवला कायद्याचा धाक
कल्याण पूर्वेतील गोळीबारानंतर मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन; निष्पाप वाटसरू गंभीर जखमी
कल्याण विभागीय (विजयकुमार पाटील) : कल्याण पूर्व भागात बुधवारी रात्री दोन प्रतिस्पर्धी टोळ्यांमधील किरकोळ वादाचे रूपांतर भीषण गोळीबारात झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या गोळीबारात एक निष्पाप वाटसरू गोळी लागून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या काही तासांत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त (डीसीपी) अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.
त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्यरात्री विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या मोहिमेदरम्यान गोळीबार प्रकरणातील चार संशयित गुंडांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
परिसरात कायद्याचा धाक निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींना घटनास्थळी आणून त्यांची धिंड काढली. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे स्वागत केले असून, गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीही व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून गोळीबारामागील नेमके कारण, संबंधित टोळ्यांचा पूर्वीचा वाद आणि इतर आरोपींचा सहभाग याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
