चाळीसगाव रोड पोलिसांची धडक कारवाई; ९.०५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, जबरीचोरी व चोरीचे सहा गुन्हे उघड
धुळे (सुनील निकम) प्रतिनिधी : धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात झालेल्या जबरीचोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत चाळीसगाव रोड पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्या ताब्यातून कार, रिक्षा आणि सात मोटारसायकलींसह एकूण ९ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे जबरीचोरी आणि चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले असून तिसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
१२ जून २०२६ रोजी सकाळच्या सुमारास मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील चाळीसगाव रोड चौफुलीपुढील साई निवारा परिसरात फिर्यादी विलास दामू पठारे (रा. बनपिंपरी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांच्याकडील मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण १५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात आरोपींनी जबरदस्तीने हिसकावून नेला होता. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे फैजान अहमद मुजम्मील अन्सारी ऊर्फ ‘इन्या’ (वय २१, रा. हाजी नगर, कबीरगंज, धुळे) आणि शाहीद मुख्तार शेख (रा. अंबिकानगर, धुळे) यांना जनता सोसायटी, इसहाक मशिदीजवळील वडजाई रोड परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीत दोन्ही आरोपींनी आणखी एका साथीदाराच्या मदतीने सदर जबरीचोरी केल्याची कबुली दिली. तसेच दोंडाईचा, आझादनगर आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील पूर्वी केलेल्या चोरीच्या गुन्ह्यांचीही माहिती दिली. आरोपींच्या कबुलीजबाबानुसार चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून फरार साथीदाराचा शोध सुरू आहे.
या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून एक कार, एक रिक्षा आणि सात मोटारसायकली असा एकूण ९.०५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यामुळे विविध पोलीस ठाण्यांतील जबरीचोरी आणि चोरीचे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
दरम्यान, अटक करण्यात आलेला आरोपी फैजान अहमद मुजम्मील अन्सारी ऊर्फ इन्या याच्याविरुद्ध यापूर्वीच जबरीचोरी, चोरी आणि एनडीपीएस कायद्याअंतर्गत १६ गुन्ह्यांची नोंद असून जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा गुन्हे करण्याची त्याची पद्धत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, पोलीस उपनिरीक्षक हरीशचंद्र पाटील, संदीप काळे तसेच पोलीस अंमलदार अविनाश वाघ, अतिक शेख, संदीप वाघ, शोएब बेग, सारंग शिंदे आणि सचिन पाटील यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
