मुंबई | विक्रांत पाटील
येत्या २२ जूनपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानभवन परिसरातील अनावश्यक गर्दीला आळा घालण्यासाठी यंदा प्रथमच ‘डिजिटल प्रवेशपास’ व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. अधिवेशन सुरळीत, सुरक्षित आणि नियोजनबद्धरित्या पार पडावे यासाठी शिस्त व सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या महत्त्वपूर्ण उपाययोजनेचे निर्देश दिले आहेत. या नव्या डिजिटल पास प्रणालीमुळे अधिवेशनादरम्यान होणाऱ्या अनावश्यक गर्दीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येणार आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सभापती राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत ठरल्यानुसार, दैनंदिन कामकाजात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून कार्यालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी येण्या-जाण्याकरिता पर्यायी प्रवेशद्वाराची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवेश नियंत्रण व्यवस्था अधिक काटेकोर करण्यासोबतच पोलीस विभागाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुरेसा आणि चोख बंदोबस्त तैनात ठेवावा, अशा कडक सूचनाही सभापतींनी या बैठकीत दिल्या आहेत.
सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणासोबतच इतर महत्त्वाच्या पायाभूत सोयी-सुविधांचाही या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरक्षित मंडप उभारावेत आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने सुसज्ज वैद्यकीय सुविधांसह अनुभवी डॉक्टरांची टीम तैनात ठेवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, अखंडित वीजपुरवठा, सुरक्षारक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था, अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासणी, सदस्यांसाठी अग्रक्रमाने रेल्वे आरक्षण आणि वार्तांकनासाठी येणाऱ्या पत्रकारांसाठी सुसज्ज मंडप व आवश्यक सुविधा पुरविण्याचे आदेशही सभापतींनी संबंधित विभागांना दिले आहेत.
