सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला; नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षकांसमोर तपासाचे मोठे आव्हान
। योगेश पी पाटील सर । धरणगाव तालुका | प्रतिनिधी
धरणगाव येथील चिंतामणी मोरया परिसरातील श्री स्वामी समर्थ केंद्रात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत दानपेटी फोडून चांदीच्या वस्तू, रोकड आणि इतर मौल्यवान साहित्य असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १६ जूनच्या मध्यरात्री सुमारे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान तीन ते चार चोरट्यांनी मंदिर परिसरात प्रवेश केला. प्रवेशद्वार अथवा मागील भिंतीच्या बाजूने आत शिरलेल्या चोरट्यांनी सर्वप्रथम सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर काढून नेला, जेणेकरून त्यांचे चेहरे रेकॉर्ड होऊ नयेत.

त्यानंतर त्यांनी कटरच्या साहाय्याने मंदिरालगतच्या खोलीचे कडी-कोंडे तोडून आत प्रवेश केला. तेथील गोदरेज कपाटातील रोकड, चांदीचे मुकुट, चांदीच्या लहान मूर्ती आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. तसेच मंदिरातील दानपेटी उचलून बाहेर नेल्यानंतर ती फोडून त्यातील रोकडही घेऊन चोरटे पसार झाल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलीस टाइमचे कार्यकारी संपादक तथा धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत सदस्या मंगला महाजन, त्यांचे सुपुत्र टोनी महाजन तसेच स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरी व भाविक यांच्याशी त्यांनी चर्चा केली.
प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी चोरीपूर्वी मंदिर परिसराची अनेक वेळा रेकी केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. मंदिरातील कपाट, डीव्हीआर, रोकड व चांदीच्या वस्तूंची अचूक माहिती असल्यामुळे ही चोरी पूर्वनियोजित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वीही या ठिकाणी दोन वेळा किरकोळ चोरीच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेच्या दिवशीच धरणगावचे पोलीस निरीक्षक पवार यांची एरंडोल येथे बदली झाली असून त्यांच्या जागी उमाकांत गायकवाड यांनी पदभार स्वीकारला. रुजू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी घडलेल्या या मोठ्या चोरीमुळे तपासाचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी सांगितले की, स्वामी समर्थ केंद्राच्या संचालकांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणी परिसरातील नागरिकांनी किंवा भाविकांनी संशयास्पद हालचाली अथवा संबंधित माहिती पाहिली असल्यास तातडीने धरणगाव पोलिसांशी संपर्क साधून तपासात सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस टाइमचे कार्यकारी संपादक तथा माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील यांनी केले आहे.
