स्पिरीटपासून तयार होत होती बनावट दारू; एक आरोपी ताब्यात, बोलेरोसह दारू निर्मितीचे साहित्य जप्त
नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेत मोठी कारवाई करत बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून तब्बल 10 लाख 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या निर्देशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील जुगनी गावातील दुगलीबारी पाड्यावर ही कारवाई केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत एका घरात स्पिरीटचा वापर करून बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा झाल्यानंतर विशेष पथक तयार करून तातडीने छापा टाकण्यात आला.
पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता संबंधित कौलारू घरातून स्पिरीटचा तीव्र वास येत असल्याचे निदर्शनास आले. खिडकीतून पाहणी केल्यानंतर एका व्यक्तीला दारूच्या बाटल्यांमध्ये द्रव पदार्थ भरताना आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी घरात प्रवेश करून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने आपले नाव लक्ष्मण हात्या पाडवी (वय 31), रा. तलावडी, ता. धडगाव, जि. नंदुरबार असे सांगितले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी 39 बॉक्स बनावट देशी दारू, 150 लिटर स्पिरीट, दारूच्या बाटल्यांचे बुच पॅकिंग करणारे इलेक्ट्रिक मशीन, दारू निर्मितीसाठी लागणारे विविध साहित्य तसेच एक बोलेरो चारचाकी वाहन असा एकूण 10 लाख 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 123 तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अवैध दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, जिल्ह्यात अशा बेकायदेशीर धंद्यांवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
