फेरआरक्षणाची मागणी; ३ जुलै रोजी होणार सुनावणी, निकालाकडे ग्रामस्थांचे लक्ष
भुसावळ (प्रतिनिधी): भुसावळ तालुक्यातील आचेगाव येथे सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर ११ जून रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत मंजूर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर वाद निर्माण झाला आहे. अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गाला आरक्षणात स्थान न दिल्याचा आरोप करत समाजसेवक प्रकाश रामा सुरवाडे यांनी उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) भुसावळ यांच्याकडे लेखी हरकत नोंदवली आहे.
११ जून रोजी आयोजित विशेष ग्रामसभेत गावाच्या प्रभाग रचनेचा आराखडा सादर करण्यात आला. या रचनेत विविध प्रवर्गांना प्रतिनिधित्व देण्यात आले असले, तरी अनुसूचित जाती प्रवर्गाला कोणतेही स्थान देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे संबंधित समाजामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रकाश सुरवाडे यांनी सादर केलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की, आचेगावमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या सुमारे २५० ते ३०० दरम्यान असून गेल्या १५ ते २० वर्षांपासून या समाजातील अनेक कुटुंबे गावात वास्तव्यास आहेत. एवढी लक्षणीय लोकसंख्या असतानाही प्रभाग रचना आणि आरक्षण प्रक्रियेत या प्रवर्गाला स्थान न देणे ही अन्यायकारक बाब असून लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तक्रारीत प्रभाग रचना आणि आरक्षणाची फेरतपासणी करून अनुसूचित जाती प्रवर्गाला न्याय मिळेल अशा पद्धतीने फेरआरक्षण जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालयाने या हरकतीची दखल घेत संबंधित प्रकरणाची नोंद केली असून ३ जुलै रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. या सुनावणीत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे आचेगावातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले असून ग्रामस्थांच्या नजरा आता ३ जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीच्या निकालाकडे लागल्या आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न कशा प्रकारे निकाली निघतो, याबाबत गावात उत्सुकता निर्माण झाली आहे.
