श्री स्वामी समर्थ केंद्रात माजी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम; योग, प्राणायामातून दिला निरोगी जीवनशैलीचा संदेश
नशिराबाद, धीरज सैतवाल । प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत न्यु इंग्लिश स्कूल, नशिराबाद येथील दहावीच्या १९९०-९१ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी एकत्र येत योगासन कार्यक्रमाचे आयोजन केले. श्री स्वामी समर्थ केंद्र येथे पार पडलेल्या या उपक्रमाला माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रविवार, २१ जून २०२६ रोजी सकाळी ६ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात १९९०-९१ बॅचचे माजी विद्यार्थी विशेष छापील टी-शर्ट परिधान करून सहभागी झाले होते. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा करत आरोग्यदायी जीवनाचा संदेश दिला.
निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात सहभागी सदस्यांनी सूर्यनमस्कारासह विविध योगासनांचे सादरीकरण केले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहते, तणाव कमी होतो तसेच सकारात्मक विचारसरणी विकसित होते, असा संदेश यावेळी देण्यात आला.
योग हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा असून निरोगी जीवनासाठी प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा, असे मत उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. समाजात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच भावी पिढीपर्यंत योगाचे महत्त्व पोहोचवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे परिसरात आरोग्य आणि योगाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, माजी विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडले. नशिराबाद परिसरात या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
चौकट
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये
-
१९९०-९१ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
-
श्री स्वामी समर्थ केंद्र येथे योगासन व प्राणायाम सत्र
-
विशेष छापील टी-शर्टमुळे आकर्षण
-
निरोगी जीवनशैलीचा प्रभावी संदेश
-
समाजात योगाबाबत जनजागृतीचा प्रयत्न
