९ म्हशी, २ पारडू व चोरीस गेलेले चारचाकी वाहन हस्तगत; चार गुन्ह्यांची उकल, तीन आरोपी फरार
धुळे | प्रतिनिधी
साक्री आणि पिंपळनेर परिसरातील शेतकऱ्यांचे पशुधन चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ९ म्हशी, २ पारडू आणि चोरीस गेलेले चारचाकी वाहन हस्तगत करण्यात आले असून पशुधन चोरीचे तीन आणि वाहन चोरीचा एक अशा एकूण चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
साक्री व पिंपळनेर परिसरात गेल्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या शेतातून पशुधन चोरीच्या घटना घडत होत्या. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पशुधनाच्या चोरीमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना गुन्ह्यांचा छडा लावण्याचे निर्देश दिले होते.
यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने विशेष तपास पथक तयार करून साक्री, पिंपळनेर, निजामपूर तसेच धुळे जिल्ह्यालगतच्या विविध भागांत समांतर तपास सुरू केला. सलग सात दिवस तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि स्थानिक पातळीवरील चौकशीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला.
दि. २२ जून २०२६ रोजी साक्री-नवापूर महामार्गावरील एका पानटपरीजवळून पोलिसांनी सराईत गुन्हेगार सुरेश ऊर्फ सुऱ्या रमेश गावीत (वय ३२, रा. सारवट, ता. नवापूर, जि. नंदुरबार) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपल्या तीन साथीदारांसह साक्री व पिंपळनेर परिसरातून म्हशी चोरी केल्याची कबुली दिली.
या टोळीत प्रभु होडया गावीत (रा. उची शेवडी), योहान जनू गावीत (रा. ओन्टी पाडा, विसरवाडी) आणि रवि गावीत (रा. रायपूर), ता. नवापूर, जि. नंदुरबार यांचा समावेश असल्याचे समोर आले. आरोपींनी टाटा आरएक्स चारचाकी वाहनाचा वापर करून पशुधन चोरीचे गुन्हे केल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली.
आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांनी साक्री-नवापूर महामार्गालगतच्या जंगल परिसरात छापा टाकून चोरीस गेलेल्या ९ म्हशी, २ पारडू आणि वापरलेले चारचाकी वाहन हस्तगत केले. यामुळे पशुधन चोरीचे तीन आणि वाहन चोरीचा एक अशा चार गुन्ह्यांची उकल झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीचे आंतरजिल्हा स्वरूपाचे रॅकेट असून त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही शेती अवजारे चोरीसह विविध गुन्हे दाखल आहेत. आरोपी सुरेश ऊर्फ सुऱ्या गावीत आणि प्रभु गावीत यांच्याविरुद्ध चोरीचे तब्बल १० गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. त्यांच्या अटकेनंतर पशुधन चोरी, शेती अवजारे चोरी तसेच शेतमाल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने यशस्वीपणे पार पाडली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये या कारवाईमुळे समाधान व्यक्त करण्यात येत असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
