दोन-तीन दिवसांपासून तांत्रिक बिघाड कायम; तासनतास प्रतीक्षा करूनही तत्काळ तिकीट हुकल्याने प्रवाशांमध्ये संताप
बेटावद | प्रतिनिधी
रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी तत्काळ तिकीट सेवा ही ऐनवेळच्या प्रवासाची मोठी सोय मानली जाते. मात्र, बेटावद व परिसरातील प्रवाशांना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नरडाणा रेल्वे स्थानकावरील आरक्षण केंद्रात गंभीर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तत्काळ तिकीट बुकिंगच्या महत्त्वाच्या वेळेत रेल्वेचा सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने प्रवाशांना तिकीट मिळणे कठीण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेटावद परिसरातील अनेक प्रवासी न्यू कुचबिहार (NCB) तसेच इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांचे तत्काळ आरक्षण करण्यासाठी सकाळीच नरडाणा रेल्वे स्थानकावर गर्दी करतात. मात्र, तत्काळ बुकिंग सुरू होताच इंटरनेट नेटवर्कमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण होतो. परिणामी, बुकिंग प्रक्रिया अर्धवट राहते किंवा व्यवहार पूर्ण न झाल्याने तिकीट रद्द होते.
या समस्येमुळे अनेक प्रवाशांना सलग दोन ते तीन दिवस नरडाणा रेल्वे स्थानकाच्या चकरा माराव्या लागत आहेत. लांबून येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास खर्च वाढत असून, वेळ आणि पैशांचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. तातडीच्या प्रवासाचे नियोजनही विस्कळीत होत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
प्रवाशांची प्रतिक्रिया
बेटावद येथील प्रवासी रहीम पठाण यांनी सांगितले की, “तातडीच्या कामासाठी तत्काळ तिकिटाची गरज होती. मात्र, दोन-तीन दिवसांपासून नरडाणा स्टेशनवर जाऊनही प्रत्येकवेळी नेटवर्कची समस्या निर्माण होत आहे. रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ व्यवस्थेमुळे आमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहेत.”
रेल्वे प्रशासनाच्या डिजिटल सुविधांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रवाशांनी तत्काळ तिकीट बुकिंगच्या मुख्य वेळेतच सर्व्हर डाऊन होण्याचे कारण शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नरडाणा रेल्वे स्थानकावरील तांत्रिक त्रुटी त्वरित दूर करून तत्काळ तिकीट सेवा सुरळीत सुरू करावी, अशी बेटावद व परिसरातील प्रवाशांची जोरदार मागणी आहे.
