पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते चिमुकल्याला पोलिओचे दोन थेंब; ‘एकही बालक वंचित राहू नये’ असे आवाहन
पाळधी | प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ रविवारी (दि. २८ जून) पाळधी येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते एका चिमुकल्या बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर प्रमुख उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पाच वर्षांखालील प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ लसीचे दोन थेंब पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, ही केवळ आरोग्य विभागाची नव्हे तर पालक आणि संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.” त्यांनी नागरिकांना शासनाच्या या लोकहिताच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश झवर, डॉ. सायमा खान, लोकनियुक्त सरपंच बापूसाहेब विजय पाटील, ग्रामविकास अधिकारी दीपक पाठक, आरोग्य सहाय्यक अनिल महाजन व हितेश पाटील, आरोग्य सेवक अतुल नन्नवरे व प्रदीप अडकमोल, गटप्रवर्तक संगीता पाटील, चेतना पाटील तसेच आशा सेविका आणि आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले असून नागरिकांनी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
