स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य; पुढील उपचारासाठी जळगाव शासकीय रुग्णालयात हलविले
भुवनेश्वर दुसाने ।पाचोरा | प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे पाचोरा शहरातील गोंड वस्ती परिसरात एक घर कोसळून दुर्घटना घडली. या घटनेत घरातील एक चिमुकली ढिगाऱ्याखाली अडकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच शिवसेना शहरप्रमुख सुमित सावंत यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने युद्धपातळीवर बचावकार्य राबवून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चिमुकलीची सुखरूप सुटका करण्यात आली.
जखमी मुलीला तातडीने पाचोरा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी तिला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. सुमित सावंत स्वतः चिमुकलीसोबत जळगावला रवाना झाल्याची माहिती मिळाली.
या घटनेमुळे पाचोरा शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, मुसळधार पावसामुळे धोकादायक झालेल्या घरांची तातडीने पाहणी करून बाधित कुटुंबांना मदत करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
